पुणे : येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांकडून "असाक्षर मुक्त गाव"ची शपथ घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या 'उल्लास - नव भारत साक्षरता अभियान'च्या प्रचारासाठी जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत. राज्य शासन साक्षरता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर सर्व शाळांमध्ये हा शपथविधी होणार आहे.
विद्यार्थी ही शपथ घेणार आहेत:
"माझे कुटुंब आणि गाव १ मे २०२७ पर्यंत साक्षर करेन. माझ्या परिसरातील एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी प्रयत्न करेन. कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील लोकांना वाचन, लेखन आणि संख्याज्ञान शिकवण्यासाठी मदत करेन. किमान दोन असाक्षर व्यक्तींना साक्षर करेन. माझा महाराष्ट्र साक्षर करण्यासाठी १० टक्के योगदान देईन."
१५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि शाळेत न जाऊ शकलेल्या नागरिकांसाठी हे अभियान आहे. यात वाचन-लेखनासोबत डिजिटल साक्षरता आणि जीवन कौशल्येही शिकवली जातील. विद्यार्थ्यांनी घरी जाऊन आजी-आजोबा, पालक किंवा शेजाऱ्यांपैकी किमान २ जणांना शिकवण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळांनी १५ ऑगस्टला सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसमोर शपथ घ्यायची आहे. तसेच गावात रॅली आणि जनजागृती करून असाक्षर लोकांची नोंदणी 'उल्लास अॅप'वर करायची आहे.
डॉ. कारेकर म्हणाले, "शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य आहे. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्यास २०२७ पर्यंत आपण जिल्हा असाक्षर मुक्त करू शकतो." या उपक्रमामुळे गावागावात साक्षरतेची चळवळ उभी राहून प्रत्येक नागरिक शिक्षणाच्या प्रवाहात येईल अशी अपेक्षा आहे.