पुणे : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त आज महाराष्ट्रभर विविध ठिकाणी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील नायगाव येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात शहीद जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षभरात देशभरातील विविध पोलीस दलांतील 191 जवानांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. यात 34 अधिकारी आणि 157 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व शूर जवानांच्या पवित्र स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विविध देशांचे राजनैतिक प्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील कार्यक्रमात हजेरी लावून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. राज्यभरात जिल्हा मुख्यालयांमध्येही पोलीस दलातर्फे संचलन आणि मानवंदना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज देशभरातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे.