पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणातील मोठा अडथळा दूर करण्यासाठी पुण्यातील ज्येष्ठ अभियंता आर. बी. सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वखर्चाने आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या सहकार्याने जिल्ह्यातील १९ हून अधिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. या उपक्रमाचा लाभ आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थिनींना झाला आहे.
या मोहिमेअंतर्गत नुकतेच पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील डॉ. शंकरराव कोलते विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे शाळेकडे हस्तांतरण करण्यात आले. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थिनी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या सुविधेमुळे मुलींना मोठा लाभ होणार असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते, ही बाब वृत्तपत्रातील बातम्यांमधून समोर आल्यानंतर सूर्यवंशी यांनी २०१३ पासून या प्रश्नावर काम सुरू केले. शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या खर्चातून १२ आणि बी.आय.ए. पुणे सेंटरच्या माध्यमातून ७ अशी एकूण १९ दर्जेदार स्वच्छतागृहे उभारली आहेत.
याबत बोलताना आर. बी. सूर्यवंशी म्हणाले की, मुली साक्षर होण्यातच संपूर्ण समाजाचे हित आहे. ग्रामीण भागातील मुलींना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा आवश्यक आहेत. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांनी हे काम केवळ प्रशासकीय औपचारिकता न समजता राष्ट्रीय मोहीम म्हणून हाती घ्यायला हवे.
या उपक्रमांतर्गत भोर, खेड, बारामती, शिरूर, वेल्हे, आंबेगाव, पुरंदर आणि पुणे तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वारजे, भानोबा विद्यालय कोयाळी, शिवशंभो विद्यालय एखतपूर, विद्या महामंडळ प्रशाला कोथळे, मोहोळ माध्यमिक प्रशाला पाळू, महर्षी वाल्मिकी हायस्कूल वाल्हे, मातोश्री सोनाबाई रामचंद्र दंडगे विद्यालय रुळे, श्री नागेश्वर विद्यालय आंबावडे, न्यू इंग्लिश स्कूल गुरोळी, श्री बाबालाल काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द, न्यू इंग्लिश स्कूल जेऊर, माध्यमिक विद्यालय गडदरवाडी, न्यू इंग्लिश स्कूल जावळजुंज, राजुरी माध्यमिक विद्यालय, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय अवसरी खुर्द, विजय मुकुंद आठवले माध्यमिक विद्यालय माळेगाव नसरापूर, वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय पिंगोरी, सरस्वती विद्यालय विसापूर आणि शंकरराव कोलते विद्यालय पिसर्वे येथे स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.
या सुविधेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबल्याचे शिक्षकांनी सांगितले. सोयीअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुली आता सुरक्षित वातावरणात शिक्षण पूर्ण करत आहेत.
दरम्यान, शाळेच्या इमारतीच्या आराखड्यातच विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेची तरतूद असलेल्या स्वच्छतागृहांचा समावेश असणे बंधनकारक करावे. अशी सुविधा नसलेल्या शाळांचे नकाशे मंजूर करू नयेत आणि प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्याची खात्री केल्याशिवाय बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, अशी अपेक्षाही सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.