मोठी बातमी : विदर्भात काँग्रेसला मोठा झटका ! दर्यापूरच्या नगराध्यक्षा-19 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश - टॉप न्यूज मराठी

मुंबई : विदर्भातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसला दणका देत अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा आणि 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.

दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांनी आपल्या 19 नगरसेवकांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यासोबतच अकोल्याचे ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांचे सहकारी, तसेच प्रहार संघटना, शौर्य सेना आणि बेळगावमधील काही पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. हा सर्व पक्षप्रवेश आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झाला.

प्रवेशानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, "दर्यापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. शहरातील रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी महायुती सरकार पूर्ण मदत करेल." या सामूहिक प्रवेशामुळे दर्यापूर नगर परिषदेतील काँग्रेसची ताकद जवळपास संपली आहे. त्याचवेळी विदर्भात शिवसेनेची पकड मजबूत झाली आहे. या कार्यक्रमाला आमदार मनीषा कायंदे, सुधाकरराव भारसाकळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बच्चू कडू यांच्या माध्यमातून विदर्भात सुरू असलेल्या संघटनवाढीला यामुळे मोठे बळ मिळाले आहे. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे महायुतीला विदर्भात मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.