भयानक : परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंधाला विरोधातून आईनेच केली 19 वर्षीय पोटच्या मुलीची हत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ - टॉप न्यूज मराठी

उल्हासनगर : आपल्या मुलीचे परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने संतप्त झालेल्या एका आईने आपल्याच पोटच्या मुलीची स्कार्पने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या कॅम्प 1 मधील भैय्यासाहेब आंबेडकर नगरमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प 1 मध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचे शेजारीच राहणाऱ्या एका परजातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला तिची आई आशा गरुड हिने विरोध केला होता. 

रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास याच कारणावरून अमृता आणि तिच्या आईमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अमृताने आपण आता घर सोडून जाणार आणि त्या प्रियकरासोबत राहणार असल्याचे आईला सांगितले. हे ऐकून रागाच्या भरात आईने जवळच असलेल्या स्कार्पने अमृताचा गळा आवळला. यात अमृताचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर अमृताचे वडील स्वतः उल्हासनगर पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.

या प्रकरणाबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सांगितले की, "मुलीचे परजातीतील तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्याला घरच्यांचा विरोध होता. मध्यरात्री झालेल्या भांडणात मुलीने पळून जाण्याची धमकी दिल्याने आईने रागात येऊन स्कार्पने गळा आवळून तिची हत्या केली. वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.