पुणे - पुणे पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी आता अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण होऊनही कोणत्याच उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला 1 लाख 13 हजार 95 मतांचा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या आणि पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या मतमोजणीत 26 व्या बाद फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत 1 लाख 11 हजार 349 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांना 1 लाख 2 हजार 479 मते मिळाली आहेत.
नियमांनुसार विजयासाठी 1 लाख 13 हजार 95 मतांचा कोटा ओलांडणे आवश्यक आहे. हर्षदा देशमुख-जाधव यांना आता विजयासाठी फक्त 1 हजार 750 मतांची गरज आहे. त्यामुळे पुढील काही फेऱ्यांमध्ये त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांना बाद करून त्यांची दुसऱ्या पसंतीची मते आघाडीच्या उमेदवारांना वळवली जात आहेत. त्यामुळे प्रत्येक फेरीनंतर चित्र बदलत आहे. पुणे पदवीधरमध्ये यावेळी 62.78 टक्के मतदान झाले होते आणि एकूण मतमोजणीसाठी 100 टेबल लावण्यात आले आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून निकालाकडे लक्ष लागले असून थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.