व्यक्तिविशेष : वयाच्या 16 व्या वर्षी बांधकाम साईटवर काम, आज 3500 कोटींच्या साम्राज्याचे मालक; आईला दिलेल्या एका वचनाने बदलले पुनीत बालन यांचे आयुष्य - टॉप न्यूज मराठी

व्यक्तिविशेष : पुण्याच्या गणपतीत ढोल-ताशांच्या गजरात एक चेहरा नेहमी दिसतो. अंगावर साधा कुर्ता, कपाळावर गुलाल आणि भोवती हजारो कार्यकर्ते. तो चेहरा आहे पुनीत बालन यांचा. लोक त्यांना गणेशोत्सवाचा ब्रँड म्हणतात. पण या गुलालामागे एक अशी कहाणी आहे, जी पुण्यापासून थेट काश्मीरच्या बर्फाळ दऱ्यांपर्यंत जाते.

रिकाम्या खिशातून सुरू झालेला प्रवास

गोष्ट 1960 च्या दशकातली. 11 वर्षांचे एक बालक मदुराईहून पुण्यात येते, खिशात एक रुपयाही नाही. ते बालक म्हणजे एस. बालन. याच व्यक्तीने पुढे पुण्यात इमारतींचे साम्राज्य उभे केले. याच वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे चिरंजीव पुनीत बालन वयाच्या 16 व्या वर्षी उन्हात साईटवर उभे राहिले. शाळा-कॉलेज करता करताच त्यांनी सिमेंट-विटा ओळखल्या. आज त्याच पुनीत बालन ग्रुपने पुणे, बंगळुरू, दुबई मिळून 5 कोटी स्क्वे. फूटांपेक्षा जास्त स्वप्नांची घरं बांधली आहेत.

आईचे ते एक वाक्य

पैसा खूप कमावला, पण पुनीत बालन यांना श्रीमंत त्यांच्या आईच्या एका वाक्याने केले. 2007 साल. आई इंद्राणी बालन म्हणाल्या, " बाळा, 100 रुपये कमावलेस तर 30 रुपये देशाला दे, 40 रुपये स्वतःसाठी ठेव आणि 30 रुपये त्या माणसाला दे ज्याच्याकडे काहीच नाही." ते वाक्य पुनीत बालन यांनी आयुष्यभरासाठी गाठ मारून ठेवले. त्यातूनच जन्म झाला इंद्राणी बालन फाउंडेशनचा. त्यांची हि कहाणी त्यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना सांगितली.  

जेव्हा पुण्याचे सुपुत्र काश्मीरचे झाले

कलम 370 हटवल्यानंतर जेव्हा मोठमोठे उद्योजक काश्मीरकडे बघायला घाबरत होते, तेव्हा पुण्याचे हे सुपुत्र सैन्याच्या अधिकाऱ्यांना भेटले. म्हणाले, मला इथल्या मुलांना शिकवायचे आहे. आज बारामुल्ला, कुपवाडा, पुलवामा, अनंतनाग - जिथे गोळ्यांचा आवाज येतो, तिथे त्यांच्या फाउंडेशनच्या 11 शाळा सुरू आहेत. दोन शाळा तर दिव्यांग मुलांसाठी आहेत. तिथल्या अनाथ मुलींसाठी त्यांनी घरं बांधली. 5000 पेक्षा जास्त काश्मिरी तरुण-तरुणींना, खेळाडूंना त्यांनी मदत केली आहे. म्हणूनच भारतीय लष्कराने त्यांना खास सन्मानपत्र दिले आहे.

एका व्यक्तीत किती रूपे

सकाळी ते बिल्डर आहेत, दुपारी ते मुळशी पॅटर्न बनवणारे निर्माते आहेत, संध्याकाळी ते 9 क्रीडा संघांचे मालक आहेत आणि रात्री ते काश्मीरमधल्या एका चिमुकलीच्या शिक्षणाची चिंता करणारे पालक आहेत. म्हणूनच पुनीत बालन हे फक्त नाव नाही, ती एक वृत्ती आहे. आईला दिलेल्या वचनाला जागणाऱ्या एका श्रवणबाळाची वृत्ती !

माहिती स्रोत : इंटरनेट