महाराष्ट्र : कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची कोंडी अखेर पंधरा दिवसांनी सुटली. कोरमअभावी तहकूब झालेल्या निवड सभेत आज महायुतीने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या नव्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
आज 10 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. अध्यक्षपदासाठी दोन गटांमध्ये थेट लढत झाली. सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर हे मैदानात होते. तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी उमेदवारी केली होती.
या निवडणुकीत निवडून आलेल्या 25 संचालकांसह शासनाने नियुक्त केलेल्या 4 संचालकांनी मतदान केले. एकूण 29 मतांपैकी राजेश पाटील यांना 16 मते मिळाली. तर शशिकांत पाटील चुयेकर यांना 13 मते मिळाली. शासननियुक्त चारही संचालकांनी महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले.
या निकालामुळे गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदावरून सुरू असलेली चुरस आता संपली आहे. राजेश पाटील यांच्या निवडीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.