लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता 15 ऑगस्टपूर्वी येणार ! पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार का ? वाचा सविस्तर - टॉप न्यूज मराठी

मुंबई : राज्य सरकारची लोकप्रिय *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* पुन्हा एकदा चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. गेल्या काही महिन्यांपासून ई-KYC आणि छाननीमुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

आता लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापूर्वीच जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाऊ शकतो. यावर उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

ई-KYC आणि छाननीमुळे 80 लाख महिला अपात्र

योजना अधिक पारदर्शक आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केली होती. त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाने आयकर विभागाच्या मदतीने सर्व अर्जांची सखोल तपासणी सुरू केली. या छाननीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या. कागदपत्रांमध्ये विसंगती, उत्पन्नाचा निकष न जुळणे आणि इतर कारणांमुळे सुमारे 80 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. सुरुवातीला सरसकट अर्ज भरले गेले होते, पण आता नियमांनुसारच लाभ दिला जाणार आहे. सरकारने योजनेसाठी काही स्पष्ट अटी घातल्या आहेत. त्यामध्ये बसणाऱ्या महिलांनाच यापुढे दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळेल.

जुलै महिन्याचा हप्ता रखडल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम होता. मात्र आता तो लवकरच दूर होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या खात्यात निधीचे थेट हस्तांतरण करण्याबतचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता पात्र असलेल्या महिलांनी आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का आणि ई-KYC पूर्ण केले आहे का, हे तपासून घेणे आवश्यक आहे.