कृषी : प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2026-27 साठी पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत असून रब्बी हंगामातील अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता संरक्षित रकमेच्या फक्त 1.5 टक्के आहे.
कोणत्या पिकाला किती विमा संरक्षण मिळणार
गहू बागायतीसाठी प्रति हेक्टर 45 हजार रुपये, ज्वारी आणि हरभऱ्यासाठी 36 हजार रुपये, उन्हाळी भुईमुगासाठी 40 हजार 600 रुपये, रब्बी कांद्यासाठी 95 हजार रुपये आणि रब्बी मक्यासाठी 50 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी काय लागणार
योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र, बँक खाते तपशील, जमीनधारणा उतारा तसेच डिजिटल पीक सर्वेक्षणांतर्गत 100 टक्के पीक नोंदणी बंधनकारक आहे. प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर क्षेत्राची अट असून कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक आहे. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करून सहभागी होता येईल.
सन 2025-26 मध्ये पुणे जिल्ह्यातील 3 हजार 864 शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.