क्रीडा : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सुरू, 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार - टॉप न्यूज मराठी

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने सन 2024-25 आणि 2025-26 या दोन वर्षांसाठी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक आणि साहसी क्रीडापटूंना 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

क्रीडा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले जाते. यामध्ये जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता पुरस्कार, तसेच सर्वसाधारण खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमातील पुरस्कारांचा समावेश आहे.

या वर्षीची अर्ज प्रक्रिया शासनाच्या 29 डिसेंबर 2023 आणि 25 जानेवारी 2024 रोजीच्या नवीन सुधारित नियमावली 2023 नुसार राबवली जात आहे.

अर्ज कसा आणि कुठे करायचा 

इच्छुकांनी https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आणि मार्गदर्शकांनी या संधीचा लाभ घेऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.