पुणे : महाराष्ट्रातील सन २०२६-२७ च्या साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबर २०२६ पासून किंवा त्यापूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
याबाबत ९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ज्या साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर व प्रशासकीय पूर्तता पूर्ण केली आहे, असे कारखाने १५ ऑक्टोबरपासून किंवा त्यापूर्वी गाळप सुरू करू शकतील.
दरम्यान, शासनाच्या वतीने कोणत्याही साखर कारखान्याला गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची सक्ती नाही. तसेच १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येईल.
सर्व साखर कारखान्यांना गाळप सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून आवश्यक अधिकृत गाळप परवाना प्राप्त करून घेणे बंधनकारक राहणार आहे.
सन २०२६-२७ चा गाळप हंगाम सुरळीतपणे पार पडावा यासाठी राज्यातील सर्व साखर कारखाने व संबंधित घटकांनी शासन तसेच साखर आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन साखर आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.