देश-विदेश : परदेशी नागरिकांना आता भारताचा व्हिसा मिळणे अधिक सोपे होणार, 13 ऐवजी 9 श्रेणी. - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी केंद्र सरकारने व्हिसा प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. गृह मंत्रालयाने व्हिसाच्या मुख्य श्रेणी 13 वरून 9 केल्या आहेत. उपश्रेणी 49 वरून 23 करण्यात आल्या आहेत. अर्जातील माहितीचे रकानेही 65 ते 70 टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे पर्यटन, शिक्षण, उपचार आणि व्यवसायासाठी भारतात येणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

गृह मंत्रालयाने 27 ऑगस्ट 2026 रोजी हा बदल लागू केला. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये श्रेणी 22 वरून 13 करण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय मानकांचा अभ्यास करून ही नवी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

आता टुरिस्ट व्हिसा ऐवजी व्हिजिटर व्हिसा असेल. यात V-1 आणि V-2 असे दोन प्रकार असतील. V-1 हा बिझनेस मीटिंग, वैद्यकीय सल्ला, वेलनेस आणि अल्पकालीन अभ्यासक्रमासाठी, तर V-2 हा दीर्घकालीन पर्यटन आणि पर्वतारोहणासाठी मिळेल.

वैद्यकीय उपचारासाठी M-1 आणि आयुष उपचारांसाठी M-3 व्हिसा असेल. रुग्णासोबत येणाऱ्यांसाठी M-2 आणि M-4 ची सोय आहे. विद्यार्थ्यांसाठी S-1 हा शालेय व पदवी शिक्षणासाठी, तर S-2 हा पीएचडी, संशोधन आणि इंटर्नशिपसाठी असेल. व्यवसायासाठी B-1 आणि B-2 असे दोन प्रकार असतील. मशीन बसवणे, देखभाल आणि प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तज्ज्ञांना B-2 अंतर्गत ई-व्हिसा मिळेल.

नव्या व्यवस्थेत बिझनेस, डिप्लोमॅटिक, वर्क, जर्नलिस्ट, मेडिकल, ऑफिशियल, स्टुडंट, व्हिजिटर आणि मिसलेनियस अशा नऊ श्रेणी असतील. सध्या 172 देशांना ई-व्हिसा सुविधा आहे. सुधारित प्रणालीनुसार 2026 अखेरपर्यंत व्हिसा देणे सुरू होण्याची अपेक्षा आहे.