पुणे जिल्ह्यातील सर्व 121 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर; आधुनिक पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थेवर भर - टॉप न्यूज मराठी

पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘पुणे मॉडेल पीएचसी प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (PHC) टप्प्याटप्प्याने ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ५५ केंद्रांचे मागील वर्षी मॉडेल पीएचसीमध्ये रूपांतर करण्यात आले असून, उर्वरित केंद्रे यावर्षी विकसित करण्यात येणार आहेत. भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांच्या (IPHS) नवीनतम निकषांनुसार या केंद्रांचा विकास करण्यात येत आहे.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज आरोग्य केंद्रे

मॉडेल पीएचसी प्रकल्पात केवळ इमारतींचे नूतनीकरण न करता संपूर्ण आरोग्यसेवा व्यवस्था अधिक आधुनिक आणि नागरिककेंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर (Modular OT), मॉड्युलर प्रसूती कक्ष (Modular Delivery Room), आधुनिक फर्निचर, प्रशस्त प्रतीक्षा कक्ष, सुधारित कॉरिडॉर्स आणि रुग्णांसाठी आवश्यक अन्य सुविधांचा समावेश करण्यात येत आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि रुग्णाभिमुख वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणालीमुळे आरोग्यसेवा डिजिटल

मॉडेल पीएचसीमध्ये रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामुळे रुग्णांची माहिती, आरोग्यसेवा आणि संस्थेतील विविध प्रक्रियांचे डिजिटल पद्धतीने व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. माहितीचे संकलन, सेवा व्यवस्थापन आणि आरोग्यसेवा वितरण अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा उपयोग होणार आहे.

मानांकनातून गुणवत्तेला प्राधान्य

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेची मानके लागू करण्यावर जिल्हा परिषदेकडून विशेष भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना NABH मानांकन, तर १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना NQAS (National Quality Assurance Standards) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

या मानांकनांमुळे रुग्ण सुरक्षा, स्वच्छता, सेवा प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या निर्धारित मानकांची अंमलबजावणी करण्यास बळ मिळाले आहे.

३ केंद्रांमध्ये टेलिमेडिसिन सुविधा

दुर्गम व गरजू भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसिन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांशी दूरस्थ पद्धतीने सल्लामसलत करता येणार आहे.

शासकीय निधीसोबत CSRचा प्रभावी वापर

मॉडेल पीएचसी प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती (DPC), राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि जिल्हा परिषद सेस निधीचा समन्वयाने वापर करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार फर्निचर, उपकरणे आणि अन्य सुविधांसाठी जिल्हा परिषद सेस निधीचा पूरक निधी म्हणून वापर केला जात आहे.

याशिवाय CSR निधीच्या माध्यमातून वैद्यकीय उपकरणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या सौर विद्युतीकरणासाठी सहकार्य घेतले जात आहे. शासकीय आणि CSR निधीच्या समन्वयामुळे ग्रामीण आरोग्य सुविधांच्या आधुनिकीकरणाला गती मिळत आहे.

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला आधुनिक स्वरूप

डोंगराळ, दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागातील नागरिकांसह ग्रामीण जनतेला घराच्या जवळच दर्जेदार, आधुनिक आणि विश्वासार्ह प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, आधुनिक प्रसूती कक्ष, अद्ययावत फर्निचर, प्रशस्त प्रतीक्षा कक्ष, रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली, दूरस्थ वैद्यकीय सल्ला सेवा तसेच राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता मानांकनाच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण, डिजिटल आणि नागरिककेंद्रित स्वरूप देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे.