पुणे : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पुणेकरांसाठी पुणे महानगरपालिकेकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील नागरिकांना चांदण्यांच्या प्रकाशात कोजागिरीचा आनंद घेता यावा यासाठी महापालिकेच्या हद्दीतील सर्व उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यान विभागाकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 66 (10) अन्वये सार्वजनिक उद्याने, बागा व मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यानुसार शहरात एकूण 216 उद्याने विकसित करण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये रोज लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून या वेळेत विशेष वाढ करण्यात आली आहे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी उद्याने सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. यामुळे नागरिकांना कुटुंबीयांसह उद्यानात फेरफटका मारता येणार आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घेता येणार आहे.
दरवर्षी कोजागिरीला अनेक सोसायट्या आणि मित्र मंडळी उद्यानात एकत्र येऊन कार्यक्रम करतात. दुधाचा मसाला दुधाचा आस्वाद घेत गप्पा गोष्टी केल्या जातात. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाचे पुणेकरांकडून स्वागत केले जात आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सह महापालिका आयुक्त डॉ. अशोक घोरपडे यांनी केले आहे.