मोठी बातमी : जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस ! सरकारसोबतची बोलणी फिस्कटली, राज्यभर मराठा समाज आक्रमक - टॉप न्यूज मराठी

अंतरवली सराटी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्याने राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारने जरांगे यांच्या 12 मागण्या मान्य केल्याचा दावा केला होता, मात्र एकही मागणी मान्य झाली नसल्याचे सांगत जरांगे यांनी मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. यावर मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात आज सकल मराठा समाजाने रास्ता रोको केला. आंदोलनानंतर संतप्त आंदोलकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले. आधी आरक्षणाचा प्रश्न सोडवा आणि मगच बॅनरबाजी करा अशी मागणी आंदोलकांनी केली.

नाशिकच्या चांदवडमध्येही मनमाड गनूर चौफुलीवर सकल मराठा समाजाने रास्ता रोको केले. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास चांदवड तालुक्यातील मराठा बांधव मुंबईकडे कूच करतील असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते.

दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्या सण उत्सव आहेत, मराठवाड्यात दुष्काळ आहे, गणेशोत्सव आहे त्यामुळे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती त्यांनी केली आहे.