भरती परीक्षेतील गोंधळ थांबणार, 12 सप्टेंबरला पुण्यात मोठी बैठक, विद्यार्थ्यांना थेट बोलण्याची संधी - टॉप न्यूज मराठी

पुणे : राज्यातील भरती परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार आणि गोंधळ थांबवण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी तयार केलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स आता थेट विद्यार्थ्यांशी बोलणार आहे. पुण्यात 12 सप्टेंबर रोजी सल्लामसलत बैठक होणार आहे.

पुणे हे स्पर्धा परीक्षांचे मुख्य केंद्र आहे त्यामुळे पहिली बैठक पुण्यातच होत आहे. ही बैठक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडे पाच या वेळेत होईल. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील आणि पुणे विभागातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि क्लासेस चालक आपले अनुभव सांगू शकतात.

परीक्षेचे पेपर फुटणे, परीक्षा केंद्रावर होणारा गोंधळ, तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, तक्रार कुठे करायची या सगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना सूचना देता येणार आहेत.

या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावर स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना बैठकीत यायचे आहे त्यांनी आपल्या सूचना 10 सप्टेंबर पर्यंत puneexamreformstaskforce@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात. त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी कोणाला चर्चेसाठी बोलवायचे आहे याची माहिती दिली जाणार आहे.