पुणे : पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कामाचे ऑडिट करा अशी मागणी करणे दोन नगरसेवकांना चांगलीच महागात पडली आहे.
नेमके काय घडले?
राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विकासकामांची चौकशी व्हावी असा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला अनुमोदक म्हणून सुहास टिंगरे यांनी सही केली होती. यानंतर पहिल्यांदा अमोल बालवडकर यांचा विकासनिधी शून्य करण्यात आला आणि आता सुहास टिंगरे यांचाही 12 कोटी रुपयांचा निधी गोठवण्यात आला आहे.
टिंगरेंचा हल्लाबोल
निधी शून्य करण्यामागे हेच कारण आहे का ? या प्रश्नावर टिंगरे म्हणाले, "मला तशीच शक्यता वाटते." ते पुढे म्हणाले, "आमचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्यावर 70 हजार कोटींचा आरोप झाला, पण त्यांनी कधीही सूडबुद्धीने कोणत्याही आमदार-खासदाराचा एक रुपयाचाही निधी गोठवला नाही. तुम्हाला माझा वैयक्तिक राग असेल, पण हा 12 कोटींचा निधी माझ्या प्रभागातील सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी होता. माझ्या प्रभागातील अनेक कामे प्रलंबित आहेत," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
महायुतीत ठिणगी
"राज्यात आणि केंद्रात आमची युती आहे, पण पुणे महापालिकेत आम्ही विरोधी पक्ष आहोत. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावतोय, याचा अर्थ असा होत नाही," असे सांगत टिंगरे यांनी भाजपवर निशाणा साधला. या घटनेमुळे पुण्यातील महायुतीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे.