केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका करत वडेट्टीवार म्हणाले, "देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालावधीची तुलना पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाशी होऊ शकत नाही. “नेहरूंच्या नेतृत्वाखाली देश स्वातंत्र्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीतून उभा राहिला. त्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत देशाच्या विकासाचा पाया रचण्यात आला,” असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर टीका करत, “आज देशाकडे सर्व साधनसंपत्ती आणि सुविधा उपलब्ध असतानाही अनेक समस्या अजूनही तशाच आहेत. महागाई, बेरोजगारी आणि विविध प्रश्नांमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.” असा आरोप देखील वडेट्टीवारांनी केला.
मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कालावधीचा उल्लेख करत त्यांनी कठोर शब्दात टिका केली. “सरकारची 12 वर्षे पूर्ण झाली असली, तरी देशाचेच 12 वाजले आहेत, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे,” असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या टीकेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews