आरोग्य : निरोगी राहण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी योगासारखा दुसरा पर्याय नाही. धावपळीच्या जीवनात जिमला जायला वेळ मिळत नसेल तर फक्त सूर्यनमस्कार पुरेसा आहे. सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. पायाच्या बोटांपासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला याचा फायदा मिळतो. 12 आसनं आणि योग्य श्वासोच्छवास यामुळे शरीर पूर्णपणे फिट राहतं. रोज सकाळी फक्त 10 ते 15 मिनिटं किंवा फक्त 11 सूर्यनमस्कार घातले तर अनेक आजार दूर होतात. जाणून घेऊया सूर्यनमस्कार घालण्याचे जबरदस्त फायदे.
पचन सुधारतं आणि गॅस, बद्धकोष्ठता होईल दूर
रोज सूर्यनमस्कार केल्याने पचनसंस्था मजबूत होते. पोटात रक्तप्रवाह वाढतो. आतड्यांचे कार्य सुधारते. त्यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. पोट नेहमी हलके आणि साफ राहते.
शरीर होईल डिटॉक्स, फुफ्फुस होतील मजबूत
सूर्यनमस्कार करताना खोल श्वास घेतला जातो. त्यामुळे फुफ्फुसांपर्यंत पूर्ण हवा पोहोचते. रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. शरीरातील कार्बन डायऑक्साईड आणि विषारी वायू बाहेर पडतात. त्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते आणि फुफ्फुस निरोगी राहतात.
मणका होईल बळकट, पाठदुखीपासून मिळेल आराम
दिवसभर एकाच जागी बसून काम केल्याने पाठ, मान आणि कंबर दुखू लागते. सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होते. मणका बळकट होतो. स्नायू आणि लिगामेंट मजबूत होतात. कंबर लवचिक होते. पाठदुखीची समस्या हळूहळू कमी होते.
पोट आणि वजन झटपट होईल कमी
वजन कमी करायचे असेल तर डाएटिंगपेक्षा सूर्यनमस्कार जास्त फायदेशीर आहे. रोज 11 सूर्यनमस्कार घातल्याने कॅलरी बर्न होतात. पोटाची चरबी कमी होते. शरीर शेपमध्ये येते. नियमितपणे केल्यास एका महिन्यातच फरक दिसू लागतो.
त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो, दिसाल तरुण
सूर्यनमस्कार केल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. त्वचेच्या समस्या दूर होतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. रोज सूर्यनमस्कार घालणारी व्यक्ती वयापेक्षा तरुण दिसते.
मानसिक तणाव आणि चिंता होईल दूर
सध्याच्या तणावपूर्ण जीवनात मानसिक आरोग्य जपणे खूप गरजेचे आहे. सकाळी सूर्यनमस्कार घातल्याने नर्व्हस सिस्टीम मजबूत होते. स्मरणशक्ती वाढते. चिंता, तणाव, चिडचिड कमी होते. मन शांत आणि प्रसन्न राहते. दिवसभर उत्साह टिकून राहतो.
महिलांसाठी विशेष फायदेशीर, मासिक पाळीतील वेदना कमी
नियमित सूर्यनमस्कार केल्याने अनियमित पाळीची समस्या दूर होते. पोटाचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होतात. ब्लड फ्लो संतुलित राहण्यास मदत होते.
इतर फायदे कोणते
सूर्यनमस्कारामुळे शरीर लवचिक होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थायरॉईडच्या समस्येतही सूर्यनमस्कार फायदेशीर ठरतो. मधुमेह, बीपी नियंत्रित ठेवण्यासाठीही याचा फायदा होतो.
या व्यक्तींनी सूर्यनमस्कार घालू नका
गर्भवती महिलांनी सूर्यनमस्कार घालू नये. हार्निया आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी सूर्यनमस्कार टाळावा. पाठीचे दुखणे किंवा इतर गंभीर समस्या असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या किंवा योग तज्ञांच्या सल्ल्यानेच सूर्यनमस्कार घालावेत.
कसा घालावा सूर्यनमस्कार
सकाळी रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार घालावा. सुरुवातीला 3 ते 4 सूर्यनमस्कार घालून सुरुवात करा. हळूहळू संख्या वाढवून 11 पर्यंत न्या. प्रत्येक आसनात श्वासावर लक्ष ठेवा. घाई करू नका.
टीप - ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.