क्रीडा : लातूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. अवघ्या 11 वर्षांच्या जयराज शशिकिरण भिकाने याने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरी करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोलापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत त्याने बेस्ट अनरेटेड गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेसोबतच त्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंगही मिळवले आहे. जी. एच. रायसोनी मेमोरियल आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातील अनुभवी आणि मानांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत जयराजने सहा गुणांची कमाई करत 1618 परफॉर्मन्स रेटिंगची नोंद केली. सर्वसाधारण क्रमवारीत त्याने 36 वे स्थान मिळवले.
इयत्ता पाचवीत शिकणारा जयराज
जयराज हा सध्या इयत्ता पाचवीत शिकत आहे. एवढ्या लहान वयात आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग असलेल्या सहा खेळाडूंविरुद्ध त्याने आत्मविश्वासाने खेळ करत कडवी टक्कर दिली. त्याच्या या धाडसी खेळाचे स्पर्धेच्या ठिकाणी कौतुक झाले.
बेस्ट अनरेटेड गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जयराजला रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. अवघ्या 11 व्या वर्षी पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहा गुणांची कमाई करत फिडे रेटिंग मिळवल्याने लातूरच्या क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जयराजच्या या यशामुळे लातूरच्या बुद्धिबळ खेळाला नवी ओळख मिळाली असून भविष्यात तो नक्कीच मोठ्या स्पर्धांमध्ये चमकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी: असलम शेख, लातूर