मोठी बातमी : चीनचा नेपाळला मोठा इशारा; बॅरियर लेकचा स्फोट होणार ? 1000 लोक बेपत्ता असताना पुन्हा नेपाळवर मोठं संकट - टॉप न्यूज मराठी

नेपाळ-चीन सीमेवर महापुरानंतर पुन्हा एकदा महाभयंकर संकट घोंघावत आहे. हिमनदी फुटून तयार झालेले तात्पुरते सरोवर कधीही फुटू शकते असा थेट इशारा चीनने दिला आहे. नेपाळच्या आपत्ती प्राधिकरणानेही नदीकाठच्या नागरिकांना आणि बचाव पथकाला तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.

नेमकं नवीन संकट काय आहे ?

मागच्या महापुरानंतर डोंगरातून आलेल्या माती, दगड आणि बर्फाच्या ढिगाऱ्याने नदीचा प्रवाह अडवला गेला आणि तिथे एक 'बॅरियर लेक' म्हणजेच अडथळा सरोवर तयार झाले आहे. हे सरोवर चीन-नेपाळ सीमेवर पसरलेले आहे. चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने सांगितले की, पुढील तीन दिवसात या सरोवरात 30 लाख घनमीटर पाणी जमा होणार आहे, जे 1200 ऑलिम्पिक स्विमिंग पूल एवढे आहे. सध्या या सरोवरात 2.5 दशलक्ष घनमीटर पाणी साचले असून त्याची लांबी 150 मीटर आणि खोली 40-50 मीटर आहे. सर्वात धोकादायक म्हणजे या सरोवराच्या पाण्याचा रंग दिवसेंदिवस गडद होत चालला आहे, जो फुटण्याचा संकेत आहे आणि 1 सप्टेंबरच्या आसपास सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज चीनने वर्तवला आहे. 

नेमकं काय घडलं ? 

बुधवार, 27 ऑगस्ट रोजी हिमनदी कोसळल्याने ही दुर्घटना सुरू झाली. हिमनदी कोसळल्यामुळे प्रचंड वेगाने दगड, बर्फ आणि चिखल नदी प्रणालीत आला. या मलब्याने नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आणि चीनच्या तिबेटमधील ग्यिरोंग बॉर्डर पोर्टजवळ नद्यांना रोखले. हवाई फुटेजमध्ये तपकिरी पाण्याचा मोठा साठा दिसला ज्याला बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता आणि पाणी झाडे-झुडपे बुडवत ढिगाऱ्यावर दाब देत होते. यानंतर गुरुवारी नेपाळ आणि चीन दोघांनीही पूरस्थितीचा इशारा दिला. शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी हे सरोवर ओव्हरफ्लो होऊ लागले, त्यामुळे सर्व बचाव कार्य थांबवून बचाव पथकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अजूनही पाऊस सुरू असल्याने माती सैल होत असून धोका वाढला आहे. 

आतापर्यंत किती हानी ?

या महापुराने आतापर्यंत मोठी जीवित आणि वित्तहानी केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार या पुरात किमान 362 ते 469 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 1000 लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात नदीची पाणी पातळी पुन्हा वाढत आहे. आर्थिक नुकसानीचे मोठे नुकसान झाले असून चीन-नेपाळला जोडणारा महत्त्वाचा फ्रेंडशिप ब्रिज आणि इनलँड कंटेनर डेपो वाहून गेला आहे. दोन्ही देशांचे 8 सदस्यीय इंजिनिअरिंग पथक आता ड्रोन आणि 3D मॉडेलिंगच्या मदतीने पाणी बाहेर काढण्यासाठी चॅनेल खोदण्याचा प्रयत्न करत आहे.