आशीर्वाद आटा वादात ! पॅकेटवरील 100% च्या दाव्याने वाढली ITC ची डोकेदुखी; FSSAI करणार लायसन्स रद्द ? - टॉप न्यूज मराठी

ITC च्या आशीर्वाद आटा ब्रँडवर FSSAI ने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने पॅकेटवर `100% आटा, 100% मध्य प्रदेश गहू आणि 0% मैदा` असा दावा केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. FSSAI च्या मते 100% हा शब्द कायद्यात परिभाषित नाही आणि ग्राहकांची दिशाभूल करतो, त्यामुळे कंपनीला नोटीस बजावून लायसन्स रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता.

ही कारवाई नेमकी का? 

FSSAI ने मे 2025 मध्ये सर्व फूड कंपन्यांसाठी एक अॅडव्हायजरी काढली होती, ज्यात लेबल, पॅकेजिंग आणि जाहिरातींवर 100% शब्द वापरू नका असे सांगितले होते. या अॅडव्हायजरीचे पालन न केल्यामुळे 10 ऑगस्ट रोजी ITC ला 30 दिवसांत खुलासा करण्याची कारणे दाखवा नोटीस आली आणि त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी कोलकाता लायसन्सिंग अथॉरिटीने 15 दिवसांत लेबल बदलून रिपोर्ट द्या, अन्यथा लायसन्स निलंबित होईल, अशी इम्प्रुव्हमेंट नोटीस बजावली. याला कंपनीने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले असून न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी 9 सप्टेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई करू नका असे निर्देश FSSAI ला दिले आहेत. 

यावर ITC ची प्रतिक्रिया काय आहे? कंपनीचे म्हणणे आहे की सध्याच्या 2020 च्या लेबलिंग आणि 2018 च्या जाहिरात नियमांमध्ये 100% शब्दावर थेट बंदी नाही, त्यामुळे FSSAI ची अॅडव्हायजरी ही कायद्याच्या पलीकडे जाणारी आणि मनमानी आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की तिचा दावा खोटा आहे असे नोटीसमध्ये कुठेही म्हटलेले नाही. या प्रकरणामुळे FSSAI च्या रडारवर ITC एकटीच नाही. याआधी AWL Agri Business च्या Fortune सोया ऑईल ब्रँडला `100% Veg` आणि `Cholesterol Free` दाव्यासाठी, तसेच Mondelez India, Amway, Emami आणि Bonn Biscuits यांसारख्या मोठ्या ब्रँडनाही अशाच दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.