रंजक रोचक : महाराष्ट्रात लग्न म्हटले की मंगलाष्टके, वाजंत्री, मंडप आणि वऱ्हाड आठवते. पण महाराष्ट्रातच एक असे गाव आहे जिथे गेल्या शेकडो वर्षांपासून गावात एकही लग्न लागलेले नाही. या गावात लग्नाचा मंडप उभारला जात नाही, मंगलाष्टके म्हटली जात नाहीत. या गावातील मुला-मुलींची लग्ने गावाबाहेर लावावी लागतात. हे गाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चौंढाळा गाव.
चौंढाळा गावात शेकडो वर्षांपासून ही आगळीवेगळी परंपरा चालत आली आहे. गावातील कोणत्याही मुला-मुलीचे लग्न गावात होत नाही. लग्नसमारंभ गावाच्या वेशीबाहेर, सुमारे दोन किलोमीटर दूर असलेल्या मारुती मंदिर परिसरात पार पाडले जातात. ही प्रथा आजही तितक्याच काटेकोरपणे पाळली जाते.
गावाची ग्रामदैवत रेणुका देवी आहे. गावकऱ्यांच्या मते ही देवी कुमारी म्हणजेच अविवाहित आहे. तिचा आदर राखण्यासाठी आणि तिचा कोप होऊ नये म्हणून गावात मंगलाष्टके म्हणत नाहीत किंवा लग्न मंडप उभारला जात नाही. मंदिराचे पुजारी आणि स्थानिक लोकांच्या मते ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आलेली आहे.
या परंपरेमागे एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. स्थानिक आख्यायिकेनुसार एका असुराला रेणुका देवीशी लग्न करायचे होते. देवीला लग्न नको होते, तरीही असूर लग्नासाठी गावात येत होता. देवीने अट घातली की गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र एका रात्रीत गावात वळवून आणावे.
असूर मोठ्या वऱ्हाडासह कामाला लागला. मात्र भीमाने गोदावरीला लाथ मारली, त्यामुळे पाणी गावाकडे आणता आले नाही. शेवटी असूर आणि संपूर्ण वऱ्हाड दगडात रूपांतरित झाले. हे दगड आजही गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि त्यांचा कोणताही वापर केला जात नाही. त्यामुळे देवी अविवाहित राहिल्याचा मान ठेवत गावात लग्न होत नाहीत असे गावकरी सांगतात.
गावात लग्न होत नसले तरी गावातील लोकांना याचा काहीच वाईट वाटत नाही. उलट ही आमची परंपरा आहे, देवीची इच्छा आहे असे ते अभिमानाने सांगतात. लग्नासाठी गावाबाहेर मंडप उभारला जातो, पाहुणे तिथेच जमतात, जेवणावळी तिथेच होतात. फक्त गावाच्या हद्दीत मंगलाष्टके म्हटली जात नाहीत.
आज काळ बदलला आहे, तरुण पिढी शहरात शिकायला आणि नोकरीला गेली आहे, पण गावात आल्यावर तेही ही परंपरा पाळतात. गावातील एखाद्याने चुकूनही गावात लग्न लावण्याचा प्रयत्न केला तर गावकरी त्याला विरोध करतात. देवीचा कोप होईल आणि गावावर संकट येईल अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
चौंढाळा गावाची ही परंपरा आजही महाराष्ट्रातील एक अजब गजब पण खरी परंपरा म्हणून ओळखली जाते. लग्नासाठी गाव सोडावे लागते हे ऐकून बाहेरचे लोक आश्चर्यचकित होतात, पण गावकऱ्यांसाठी हीच त्यांची ओळख आहे.