महिना सुरू होताच पगार येतो आणि 10 तारखेपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त पगार संपतो. त्यानंतर महिनाभर उधारी किंवा क्रेडिट कार्डवर दिवस काढावे लागतात. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर तुम्ही पैसे कमावता पण पैसे मॅनेज करायला शिकलाच नाहीत. यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 50-30-20 चा फॉर्म्युला एकदा वापरून बघा. हा फॉर्म्युला अमेरिकेच्या सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी दिला होता आणि आज लाखो लोक यामुळे श्रीमंत होत आहेत.
हा फॉर्म्युला काय आहे
या फॉर्म्युलामध्ये तुमचा संपूर्ण पगार 3 भागात वाटायचा आहे. 50 टक्के, 30 टक्के आणि 20 टक्के.
समजा तुमचा पगार 40 हजार रुपये आहे तर त्याचे 3 भाग कसे होतील ते बघूया.
पहिला भाग - 50 टक्के गरजांसाठी
तुमच्या पगारातील 50 टक्के रक्कम म्हणजे 20 हजार रुपये तुमच्या गरजांसाठी ठेवा. गरज म्हणजे ज्या गोष्टींशिवाय तुम्ही जगूच शकत नाही.
यामध्ये घरभाडे किंवा होम लोनचा ईएमआय, लाईट बिल, किराणा, भाजी, मुलांची शाळेची फी, प्रवासाचा खर्च, मेडिकल इन्शुरन्स यांचा समावेश होतो. या खर्चाला तुम्ही टाळू शकत नाही. जर तुमचा हा खर्च 50 टक्क्यांपेक्षा जास्त होत असेल तर तुम्ही एकतर खूप महागड्या घरात राहत आहात किंवा अनावश्यक कर्ज घेतले आहे.
दुसरा भाग - 30 टक्के इच्छांसाठी
पगारातील 30 टक्के म्हणजे 12 हजार रुपये तुमच्या इच्छांसाठी ठेवा. इच्छा म्हणजे ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळतो पण नसल्या तरी तुम्ही जगू शकता.
यामध्ये बाहेर हॉटेलमध्ये जेवणे, सिनेमा, ओटीटी सबस्क्रिप्शन, नवीन कपडे, ब्रँडेड वस्तू, महागडा मोबाईल अशा गोष्टी येतात. बहुतेक लोकांचे बजेट याच ठिकाणी बिघडते. गरजा 50 टक्क्यात भागतात पण इच्छा 50 टक्क्यांपर्यंत जातात. म्हणून पगार लवकर संपतो. तुम्ही हा खर्च 30 टक्क्यातच ठेवला पाहिजे.
तिसरा भाग - 20 टक्के बचत आणि गुंतवणुकीसाठी
पगारातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 20 टक्के. म्हणजे 8 हजार रुपये पगार आल्या आल्या वेगळे काढून ठेवा. हा पैसा तुम्हाला हातही लावायचा नाही.
या 8 हजारातून तुम्ही इमर्जन्सी फंड, म्युच्युअल फंड एसआयपी, पीपीएफ किंवा कर्जाची परतफेड करू शकता. आधी बचत आणि मग खर्च हा श्रीमंत होण्याचा मंत्र आहे.
जर पगार कमी असेल तर काय करावे
जर तुमचा पगार 20 हजार असेल तर 50-30-20 जमत नसेल तर तुम्ही 60-20-20 ने सुरुवात करा. म्हणजे 60 टक्के गरजांसाठी, 20 टक्के इच्छांसाठी आणि 20 टक्के बचतीसाठी. हळूहळू जसा पगार वाढेल तसा तुम्ही 50-30-20 वर या.
सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे पगार आल्या आल्या पहिले 20 टक्के बचतीचे पैसे वेगळ्या खात्यात ट्रान्सफर करा. जे डोळ्यासमोर नसते ते खर्च होत नाही. या एका सवयीने पुढील 5 वर्षात तुमच्याकडे 5 लाखापर्यंतचा फंड तयार होऊ शकतो.