पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही, 10 कोटींचा दंड आणि 10 वर्षे कारावास, मालमत्ता जप्त होणार, MPSC परीक्षार्थींना मोठा दिलासा, काय आहे नवा कायदा, जाणून घ्या - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक खूप मोठी आणि दिलासा देणारी बातमी आली आहे. पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होणार आहे. इतकंच नाही, तर त्यांची मालमत्ताही जप्त केली जाणार आहे. भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने दुसरा अहवाल सादर केला आहे. या अहवालात पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस करण्यात आली आहे.

ही समिती का नेमली होती, तर 4 सप्टेंबर रोजी MPSC परीक्षेत गैरप्रकार, पेपरफुटी आणि अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने ज्येष्ठ आयएएस अधिकारी व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने आधी अंतरिम अहवाल दिला होता. आता दुसरा अहवाल सरकारला सादर केला आहे.

या दुसऱ्या अहवालात काय शिफारस केली आहे, ते सविस्तर पाहूया.

पहिली आणि सर्वात मोठी शिफारस म्हणजे संघटित गुन्हेगारीला कठोर शिक्षा. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारात सहभागी व्यक्ती आणि संस्थांना 7 ते 10 वर्षे कारावास होणार आहे. त्याचबरोबर किमान 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही सुचवली आहे. म्हणजे पेपर विकून कमावलेला पैसा, गाडी, बंगला, सगळं सरकार जप्त करू शकणार आहे.

दुसरी शिफारस म्हणजे अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना शिक्षा. परीक्षेत कॉपी करणारे, डमी उमेदवार बसवणारे, ब्लूटूथ किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षे कारावास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंड होणार आहे. म्हणजे आता फक्त पेपर फोडणाऱ्यालाच नाही, तर कॉपी करणाऱ्यालाही मोठी शिक्षा होणार आहे.

तिसरी शिफारस म्हणजे सेवा पुरवठादार संस्थांवर कारवाई. परीक्षा घेणाऱ्या खासगी एजन्सी, परीक्षा केंद्र चालवणाऱ्या संस्था यांनी गैरप्रकार केला तर त्यांना 5 कोटी रुपयांपर्यंत दंड आणि 8 वर्षांसाठी बंदी घातली जाणार आहे. म्हणजे त्या संस्थेला पुढील 8 वर्षे कोणतीही सरकारी परीक्षा घेता येणार नाही.

चौथी शिफारस म्हणजे तपासासाठी विशेष कृती दल, एसटीएफ. गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र एसटीएफ स्थापन करण्याची सूचना केली आहे. तसेच परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केला जाणार आहे. परीक्षा गैरप्रकारांचे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालये, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची शिफारस केली आहे. म्हणजे प्रकरणे वर्षानुवर्षे चालणार नाहीत, लवकर निकाल लागेल.

पाचवी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात आनंदाची शिफारस म्हणजे परीक्षा शुल्क परत मिळणार. MPSC परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिका, आन्सर की, वर आक्षेप घेतल्यास भरलेले शुल्कही परत केले जाणार आहे. जर तुमचा आक्षेप बरोबर निघाला तर तुम्ही भरलेले पैसे परत मिळतील.

सहावी शिफारस म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी. परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. परीक्षा केंद्रांची स्वतंत्र यादी, व्हेन्यू बँक, तयार केली जाणार आहे. फक्त तपासून, पडताळून घेतलेली केंद्रेच परीक्षा केंद्र म्हणून निवडली जातील.

सातवी शिफारस म्हणजे जागा वाढवणे आणि वयात सवलत. MPSC च्या गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी जागा 16,000 पेक्षा जास्त करण्याची शिफारस केली आहे. तसेच सर्व भरती परीक्षांसाठी वयोमर्यादेत एकवेळ 1 वर्षाची सूट देण्याची शिफारस केली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एक संधी मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, समितीने परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी, परीक्षा केंद्रे कशी असावीत आणि कायदा कसा कठोर करावा, याबाबत शिफारशी केल्या आहेत. आम्ही आगामी हिवाळी अधिवेशनात हा कायदा आणण्याचा प्रयत्न करू आणि विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करू.

याआधी केंद्र सरकारनेही पेपरफुटी विरोधात कठोर कायदा केला आहे. सार्वजनिक परीक्षा प्रतिबंधक अनुचित साधने कायदा, 2024 मध्ये 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. पण महाराष्ट्र सरकारची शिफारस त्यापेक्षा 10 पट जास्त दंडाची आहे.

या कायद्यामुळे काय फायदा होणार, तर जो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतो, ज्याचे आई-वडील कर्ज काढून त्याला शिकवतात, त्याच्यावर अन्याय होणार नाही. पेपर विकून नोकरी मिळवणाऱ्यांना आता धाक बसेल. परीक्षा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने होतील.

विद्यार्थ्यांनी काय करावे, तर कोणत्याही पेपर विकणाऱ्या टोळीच्या नादी लागू नका. पेपर विकत घेणे हा गुन्हा आहे. तुम्हाला शिक्षा होऊ शकते, तुमचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. जर तुम्हाला कुठेही पेपरफुटीची माहिती मिळाली तर ती पोलिसांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल.