आरोग्य : निरोगी राहण्यासाठी आपण काय खातो यासोबतच ते कसे आणि कधी खातो हे देखील खूप महत्वाचे आहे. अनेकदा चुकीच्या सवयींमुळे आपल्याला पचनाच्या समस्या, सांधेदुखी आणि वजन वाढण्याचा त्रास होतो. आयुर्वेदानुसार काही छोट्या सवयी बदलल्या तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.
पाणी पिण्याची योग्य पद्धत -
उभ्या उभ्या पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि किडनीवर ताण येतो. त्यामुळे नेहमी बसून आणि घोट घोट पाणी प्यावे. फ्रिजमधील अति थंड पाणी प्यायल्याने पचन बिघडते. त्याऐवजी कोमट किंवा माठातील पाणी पिणे सर्वात उत्तम मानले जाते. सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील किंवा साधे पाणी उपाशी पोटी पिणे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. याला उषःपान असे म्हणतात.
जेवणापूर्वी आणि नंतर पाणी कधी प्यावे -
जेवणापूर्वी अर्धा तास आधी पाणी प्यावे, यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जेवताना खूप गरज असेल तरच एक दोन घोट पाणी प्यावे. जेवणानंतर लगेच तांब्याभर पाणी पिणे हे विषासमान मानले जाते. यामुळे जठराग्नी मंद होतो आणि पचन बिघडते. त्यामुळे जेवणानंतर किमान 45 ते 60 मिनिटांनी पाणी प्यावे. आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच पाणी पिण्याऐवजी तुम्ही ताक किंवा लिंबू सरबत घेऊ शकता, जे पचनास मदत करते.
जेवणाच्या इतर सवयी -
विनाकारण किंवा फक्त वेळ झाली म्हणून जेवू नका. जेव्हा खरी भूक लागते तेव्हाच शरीरात पाचक रस तयार झालेले असतात. नेहमी भुकेपेक्षा थोडे कमीच जेवावे. पोटाचा एक चतुर्थांश भाग हवा आणि हालचालीसाठी मोकळा ठेवावा. रात्रीच्या जेवणानंतर किमान दोन तासांनी झोपावे आणि जेवणानंतर शंभर पावले चालावे, याला शतपावली म्हणतात.
रात्री दही खाणे टाळा -
रात्री दही खाल्ल्याने शरीरात कफ वाढतो, ज्यामुळे सर्दी, खोकला, सांधेदुखी आणि श्वसनाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे रात्री दही खाणे टाळावे. तसेच जेवणानंतर दहा ते वीस मिनिटे रोज वज्रासनात बसावे, यामुळे पचन चांगले होते.
या छोट्या सवयी आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी निश्चितच मदत करतील. त्यामुळे आजच आपल्या दिनचर्येत हे बदल करायला सुरुवात करा.