पुणे : पुणे जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात दारू विक्रीवर बंदी घालण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर मुंबई हायकोर्टाने कडक ताशेरे ओढले आहेत. फक्त एकाच जिल्ह्यात अशी बंदी का, असा सवाल करत कोर्टाने हा निर्णय मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाच्या फटकारणीनंतर आता पुणे जिल्ह्यात १० दिवसांऐवजी केवळ दोन दिवस ड्राय डे ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी १४ सप्टेंबरपासून १० दिवस दारू विक्रीवर बंदीचे आदेश काढले होते. या निर्णयाविरोधात हॉटेल मालक आणि दारू विक्रेत्यांच्या संघटनेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायाधीश एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान कोर्टाने प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. केवळ पुण्यातच दारूबंदी का, महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यात अशी बंदी नाही. केवळ पुण्यातील लोकच दारू प्यायल्यानंतर चुकीचे वागतात असे तुम्हाला दाखवायचे आहे का, असा सवाल कोर्टाने केला. परवाना असताना १० दिवस व्यवसाय बंद ठेवणे हे मनमानी असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.
तसेच १० दिवस दारू न मिळाल्यास व्यसन असणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि रुग्णालये भरतील, अशी मिश्कील टिप्पणीही मुख्य न्यायाधीशांनी केली. आदेश मागे घेणार की नाही हे स्पष्ट करा, अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असेही कोर्टाने सरकारी वकिलांना सांगितले.
यावर सरकारी वकिलांनी खुलासा करताना सांगितले की, वर्षातील ८ दिवस ड्राय डे असतात, त्यात अनंत चतुर्थीचा समावेश आहे. १० दिवस पूर्ण बंदी हे नरेटिव्ह असून आदेशात वेळेचे निर्बंध आहेत. मात्र कोर्टाने सूचना केल्यानंतर आता गणेश चतुर्थी आणि विसर्जन असे केवळ दोन दिवसच पूर्ण ड्राय डे ठेवून आदेशात उद्या सुधारणा केली जाईल, अशी माहिती सरकारतर्फे कोर्टाला देण्यात आली.