आम्लपित्ताचा त्रास सतावतोय ? गोळ्या घेण्याआधी हे 10 सोपे घरगुती उपाय करून पहा, मिनिटात मिळेल आराम - टॉप न्यूज मराठी

आरोग्य : आम्लपित्त म्हणजे अॅसिडिटी, हा आजकाल सगळ्यांनाच होणारा त्रास. चुकीची जीवनशैली, वेळेवर न जेवणे, बाहेरचे तेलकट तिखट खाणे, रात्री जागरण, ताणतणाव यामुळे पोटात अतिरिक्त आम्ल तयार होते. त्यामुळे छातीत जळजळ, पोटात दुखणे, आंबट ढेकर येणे, डोके दुखणे असा त्रास होतो. सतत गोळ्या घेण्यापेक्षा घरात असलेल्या वस्तूंनीही हा त्रास कमी करता येतो. चला तर मग पाहूया असे 10 प्रभावी घरगुती उपाय.

1. केळी

केळी हे पित्तावरचे सर्वात सोपे औषध आहे. केळी खाल्ल्याने त्यातील पोटॅशियममुळे पोटात आम्ल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. तसेच त्यातील फायबरमुळे पचनक्रिया सुलभ होते आणि पित्त कमी होते. दररोज किमान एक पिकलेले केळे खाल्ल्याने पित्ताच्या त्रासापासून आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम हे विषहारक घटक म्हणून काम करते.

2. तुळस

तुळशीमध्ये अँटीअल्सर गुणधर्म असतो. पित्त झाल्यास तुळशीची 5 ते 6 पाने दर एक तासाने चावून चघळावीत. तुळशीमधील घटक पोटातील आणि जठरातील आम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करतो आणि जळजळ कमी करतो.

3. थंड दूध

दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते. अतिरिक्त आम्ल दूध शोषून घेते. म्हणून पित्त असलेल्यांनी साखर न टाकता थंड दूध प्यावे. यामुळे पोटात आणि छातीत होणारी जळजळ लगेच कमी होते. हवे असल्यास त्यात एक चमचा साजूक तूप टाकले तरी चालेल.

4. बडीशेप

बडीशेपमधील अँटीअल्सर घटक पचन सुधारतो आणि बद्धकोष्ठता दूर करतो. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. म्हणून दर दोन तासाने एक लहान चमचा बडीशेप खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. ज्यांना रोज पित्ताचा त्रास होतो त्यांनी बडीशेप पाण्यात उकळून रात्रभर थंड करून ठेवावे आणि सकाळी ते पाणी प्यावे.

5. जिरे

ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी सकाळ संध्याकाळ एक वाटी पाण्यात एक मोठा चमचा जिरे टाकून ते उकळावे आणि अर्धी वाटी झाल्यावर तो काढा कोमट असतानाच प्यावा. किंवा सकाळ दुपार संध्याकाळ एक लहान चमचा जिरे चावून त्याची लाळ गिळावी. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटातील वायू आणि गॅसचे विकार दूर होतात.

6. लवंग

लवंग चावून तिची लाळ गिळावी. त्यामुळे पचनक्रिया सुधारून पित्त दूर होते. तसेच पोटफुगी आणि गॅसचे विकारही दूर होतात. पित्ताचा जास्त त्रास होत असेल तर एक लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यातून येणारा रस काही काळ तोंडातच राहू द्या. या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगामुळे घशातील खवखवही कमी होते.

7. आवळा

आवळा हा कफ आणि पित्तनाशक आहे. त्यातील व्हिटामिन सी अन्ननलिका आणि पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. म्हणून रोज एक चमचाभर आवळ्याची पावडर घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. तसेच कच्चा आवळा थोड्या मिठासोबत खाल्ल्यास शरीराला सर्व रस मिळतात आणि पित्त संतुलित राहते.

8. वेलची

दररोज दोन तरी वेलची खाल्ल्याने शरीरातील वात, कफ आणि पित्त यांमध्ये समतोल राखला जातो आणि पचनक्रिया सुधारते. दोन वेलची ठेचून सालीसकट एक वाटी पाण्यात टाकून अर्धी वाटी काढा करा आणि तो थंड करून प्या. याने आंबट ढेकर येणे थांबते.

9. पुदिना

पुदिन्यातील थंडाव्यामुळे पचनक्रिया सुधारून पोटदुखी आणि जळजळ थांबते. पित्त असलेल्यांनी पुदिन्याची पाने कापून पाण्यासोबत उकळून घ्यावी. थंड झाल्यावर हे पाणी प्यावे. अपचनावरही पुदिना गुणकारी आहे. पुदिन्यातील मेन्थॉलमुळे पचायला जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी आणि सर्दीपासून सुटका होते.

10. आले 

आले रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पोटातील अल्सरचा त्रास कमी होण्यास मदत होते. अद्रकमधील तिखट आणि पाचक रसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा. आले तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या. आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गूळ टाकून चघळल्यानेही लगेच आराम मिळतो.

  • या उपायांबरोबरच रोज वेळेवर जेवण करणे, भरपूर पाणी पिणे, तळलेले पदार्थ टाळणे आणि रात्री हलके जेवण करणे खूप गरजेचे आहे. जर पित्ताचा त्रास खूप जास्त वाढला असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

टीप - हा लेख माहितीसाठी आहे, कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.