मनाचे आरोग्य : ध्यान म्हणजे मनाला मिळणारा 'रिचार्ज'! आरोग्यापासून यशापर्यंत 10 जबरदस्त फायदे - टॉप न्यूज मराठी

मनाचे आरोग्य : आपल्या धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. यावर एकच रामबाण उपाय आहे - ध्यान. ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या, अस्वस्थ मनाला शांत करणे. याची सुरुवात आपण अगदी सोप्या पद्धतीने श्वासापासून करू शकतो. फक्त डोळे बंद करा आणि आपल्या नैसर्गिक श्वासासोबत रहा. 

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे त्याचे फळ आहे. ध्यान हे आपण स्वतःला देऊ शकणारे सर्वात मोठे बक्षीस आहे.

ध्यानाचे 10 तात्काळ फायदे

1. शारीरिक आणि मानसिक आजारांवर मात 

बहुतेक शारीरिक पिडा या मानसिक ताण-तणावातून निर्माण होतात. ध्यानामुळे भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आणि विवेकज्ञान मिळते. त्यामुळे बुद्धिमत्ता विकसित होते, मानसिक चिंता कमी होतात आणि परिणामी अनेक शारीरिक आजार आपोआप नाहीसे होतात.

2. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते

ध्यानातून मिळणारी ऊर्जा मेंदूला पूर्ण क्षमतेने काम करण्यास मदत करते. यामुळे स्मरणशक्ती जबरदस्त वाढते. म्हणूनच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे.

३. वाईट सवयी सुटतात 

अति खाणे, जास्त झोपणे, अति बोलणे, अति विचार करणे यांसारख्या वाईट सवयी ध्यानामुळे आपोआप सुटतात. कारण ध्यानाने आपल्याला योग्य-अयोग्य समजण्याचे विवेकज्ञान मिळते.

4. मन नेहमी आनंदी राहते  

जीवनात पराभव, अपमान आणि वेदना असूनही, आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झालेली व्यक्ती नेहमी शांत आणि आनंदी राहू शकते.

5. कार्यक्षमता अनेक पटींनी वाढते

भरपूर ऊर्जा असल्याने शारीरिक आणि मानसिक दोन्ही कामे अधिक कार्यक्षमतेने होतात. कमी वेळेत जास्त आणि दर्जेदार काम पूर्ण होते.

6. झोपेची गरज कमी होते 

अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेइतकी ऊर्जा देते. कारण झोपेत फार कमी ऊर्जा मिळते, तर ध्यानात मुबलक ऊर्जा मिळते.

7. नातेसंबंध अधिक दर्जेदार होतात

नात्यांमध्ये दुरावा येण्याचे मुख्य कारण म्हणजे आध्यात्मिक विवेकाचा अभाव. ध्यानाने हा विवेक वाढतो आणि नातेसंबंध अधिक समाधानी होतात.

8. विचारशक्तीला बळ मिळते 

शांत मनातून निघणारे विचार अधिक शक्तिशाली असतात. त्यामुळे आपली ध्येये लवकर साध्य होण्यास मदत होते.

9. जीवनाचा उद्देश समजतो

आपण विशिष्ट हेतूसाठी जन्माला आलो आहोत. हे सत्य फक्त आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व झालेले लोकच समजू शकतात.

10. सामूहिक ध्यानाची ताकद

जेव्हा 100 लोक एकत्र ध्यान करतात तेव्हा त्यांच्या सकारात्मक लहरी 5 किमी पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करतात. जगातील फक्त 4% लोक ध्यान करतात, पण त्याचा फायदा 96% लोकांना होतो. जर 10% लोकांनी ध्यान केले तर जगातील अनेक समस्या सुटू शकतात.

सुरुवात कशी कराल?

सुरुवातीला 15 मिनिटे शांत जागी बसा. डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन भरकटले तर हिमालयासारख्या शांत गोष्टीचा विचार करा. ध्यान संपल्यावर सावकाश डोळे उघडा आणि मगच उभे राहा.

रोज फक्त 15 मिनिटे ध्यान करा आणि 90 दिवसात आपल्या आणि कुटुंबातील बदल स्वतः अनुभवा. भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.