चेंबूरमध्ये धावत्या शाळेच्या बसवर कोसळले भलेमोठे झाड; 10 विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर - टॉप न्यूज मराठी

11 नंबर रोडवरील दुर्घटनेने परिसरात खळबळ; बसचे मोठे नुकसान, काही विद्यार्थी बसमध्ये अडकले होते

मुंबईतील चेंबूर परिसरात मंगळवारी सकाळी एक गंभीर अपघात घडला. चेंबूरच्या 11 नंबर रोडवरून जात असलेल्या शाळेच्या बसवर अचानक एक भलेमोठे झाड कोसळल्याने बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे 10 मुले जखमी झाली असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

झाड कोसळताच बसचे मोठे नुकसान झाले आणि काही विद्यार्थी बसमध्येच अडकून पडले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बसवर पडलेले झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, एक विद्यार्थी काही काळ बसमध्ये अडकून असल्याची माहितीही समोर आली होती.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. मात्र, ही बस नेमकी कोणत्या शाळेची होती आणि त्यावेळी बसमध्ये एकूण किती विद्यार्थी होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे चेंबूर परिसरात काही काळ वाहतूक  विस्कळीत झाली होती. दरम्यान, झाड अचानक कोसळण्यामागील कारणांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून, संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे.

#topnewsmarathi #topnews #breakingnews