अर्थकारण : डिसेंबर महिना सुरू होताच तुमच्या खिशाशी संबंधित अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. गॅस सिलेंडरच्या किमतीपासून ते कर्जाच्या हप्त्यापर्यंत, क्रेडिट कार्डच्या शुल्कापासून ते टॅक्स भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत, सगळ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे महिना सुरू होण्याआधीच हे 7 बदल समजून घ्या.
1. LPG सिलेंडरचे नवे दर
1 डिसेंबरला तेल कंपन्यांकडून घरगुती आणि कमर्शियल LPG सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातील. दर महिन्याच्या 1 तारखेला हे दर बदलतात. नोव्हेंबरमध्ये घरगुती सिलेंडर 942 रुपये आणि कमर्शियल सिलेंडर 2820 रुपये होता. डिसेंबरमध्ये दर वाढतील की कमी होतील, हे 1 डिसेंबरला सकाळीच कळेल. याशिवाय LPG साठी आधार बायोमेट्रिक e-KYC केले नसेल तर सबसिडीचा सिलेंडर मिळण्यात अडचण येऊ शकते. दोन सिलेंडरमध्ये 25 दिवसांचे अंतर ठेवणेही बंधनकारक आहे.
2. EMI वाढणार की कमी होणार, 4 डिसेंबरला कळणार
रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक 2 ते 4 डिसेंबरदरम्यान होणार आहे. ऑक्टोबरमध्ये रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवून 5.50 टक्के करण्यात आला होता. आता पुन्हा वाढ झाली तर गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे EMI वाढू शकतात. त्यामुळे ज्यांनी नवे कर्ज घ्यायचे ठरवले आहे, त्यांनी 4 डिसेंबरच्या निर्णयाची वाट पाहावी.
3. SBI क्रेडिट कार्डधारकांना नवा चार्ज
1 डिसेंबरपासून SBI कार्डवर काही मोठ्या व्यवहारांवर 1 टक्का शुल्क आणि त्यावर कर लागणार आहे. एकाच वेळी 30 हजार रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सपोर्ट पेमेंट केले तर हे शुल्क लागेल. एका बिलिंग सायकलमध्ये इंधन खर्च 50 हजार रुपयांपेक्षा जास्त झाला तर संपूर्ण इंधन खर्चावर 1 टक्का शुल्क लागेल. त्यामुळे SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनी खर्चाचे नियोजन करावे.
4. 15 डिसेंबर, अॅडव्हान्स टॅक्सची तारीख
ज्यांना अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो, त्यांच्यासाठी 15 डिसेंबर ही महत्त्वाची तारीख आहे. तोपर्यंत वर्षभराच्या टॅक्सपैकी 75 टक्के टॅक्स भरलेला असावा लागतो. वेळेत भरला नाही तर व्याज आणि दंड लागतो.
5. 31 डिसेंबर, ITR भरण्याची शेवटची संधी
वेळेत ITR भरला नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत उशिरा किंवा सुधारित ITR भरता येईल. यासाठी 1000 ते 5000 रुपये दंड लागू शकतो. ही तारीख चुकवली तर पुढे खूप त्रास होऊ शकतो.
6. पेन्शनधारकांनी लक्ष द्या
पेन्शन सुरू ठेवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे होते. ज्यांनी अजून जमा केले नाही, त्यांची डिसेंबरची पेन्शन अडकू शकते. अजूनही वेळ आहे, तात्काळ जीवन प्रमाणपत्र जमा करा.
7. बँकेचे काम आधीच उरका
डिसेंबरमध्ये बँकांना अनेक सुट्ट्या आहेत. 25 डिसेंबरला ख्रिसमस, 26 डिसेंबरला चौथा शनिवार आणि 27 डिसेंबरला रविवार, त्यामुळे 3 दिवस बँका बंद राहतील. तसेच 12 डिसेंबरला दुसरा शनिवार आहे. त्यामुळे चेक, लॉकर किंवा इतर महत्त्वाचे काम 24 डिसेंबरआधीच उरका.
एक दिलासा देणारी बातमी म्हणजे UPI ने पैसे पाठवणाऱ्या सामान्य ग्राहकांना कोणताही नवा चार्ज लागणार नाही. UPI वरील शुल्क हे दुकानदारांवर आहे, ग्राहकांवर नाही. त्यामुळे UPI वापरताना घाबरून जाऊ नका. b949
थोडक्यात, डिसेंबरमध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच बजेट बनवा आणि या तारखा डायरीत लिहून ठेवा.