राजे उमाजी नाईक महामंडळाच्या कर्जात दुप्पट वाढ होणार, 1 लाखांऐवजी आता 2 लाख मिळणार, मंत्री अतुल सावेंची मोठी घोषणा ! - टॉप न्यूज मराठी

भिवडी : रामोशी समाजाच्या तरुणांना आणि महिलांना व्यवसायासाठी मोठी संधी मिळणार आहे. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लाखावरून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणा इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी केली आहे.

भिवडी येथे राजे उमाजी नाईक यांच्या 235 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले, समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे यासाठी सरकार मदत करत आहे. महामंडळामार्फत 25 टक्के बीज भांडवल योजना आणि व्याज परतावा योजना राबवल्या जात आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात 76 वसतिगृहे सुरू केली असून त्यात भटक्या जमातींसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. गोपाळ समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यावरही सरकार सकारात्मक विचार करत आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीद्वारे संदेश देत राजे उमाजी नाईक यांचे कार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.