मुंबईकरांनो सावधान ! ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढणार ? किमान ₹1 ते ₹2 ने दरवाढीचा प्रस्ताव - टॉप न्यूज मराठी

मुंबई: महागाईच्या झळा आता मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासावरही बसणार आहेत. ऑटो-रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच परिवहन विभागाकडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.

नवीन प्रस्तावित दर काय आहेत?

- ऑटो-रिक्षा: सध्या किमान भाडे ₹26 आहे. ते ₹1 ने वाढून ₹27 होण्याची शक्यता आहे.

- टॅक्सी: सध्या 1.5 किमी साठी किमान भाडे ₹31 आहे. ते ₹2 ने वाढून ₹33 होऊ शकते.

भाडेवाढी मागचं कारण काय?

चालक संघटनांच्या मते, गेल्या काही वर्षांत खर्च प्रचंड वाढला आहे पण भाड्यात बदल झालेला नाही.

1. इंधन महागाई: पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत

2. देखभाल खर्च: गाडीच्या मेंटेनन्स आणि सुट्या भागांचे दर वाढले

3. इतर खर्च: विमा, परमिट आणि इतर शुल्कातही वाढ

चालक संघटना मात्र यापेक्षा जास्त वाढ मागत आहेत. त्यांची मागणी किमान ₹4 पर्यंत भाडेवाढ करण्याची आहे.

पुढे काय होणार ?

हा प्रस्ताव परिवहन आयुक्तांकडून MMRTA म्हणजे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे जाणार आहे. MMRTA कडून आढावा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होईल आणि नवीन दर लागू होतील.

प्रस्तावित वाढ छोटी असली तरी रोज प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीयांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान प्रवासी संघटनांकडून या वाढीला विरोध होण्याची शक्यता आहे. नवीन दर कधीपासून लागू होतात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.