आरोग्य : बाजारात ताजा आवळा आला आहे. हिरवागार, टवटवीत, कडक आवळा बघितला की हात आपोआप जातो. पण आपण काय करतो, आवळा आणतो आणि फ्रिजमध्ये ठेवतो. मग कधीतरी ज्यूस करतो, कधी कँडी आणतो, कधी पावडर घेतो. खरा फायदा त्यात नाही. खरा फायदा आहे रोज सकाळी 1 कच्चा आवळा न वाफवता चावून खाण्यात.
आवळा तुरट लागतो, हे खरे आहे. पहिल्यांदा तोंड वाकडे होते. पण हळूहळू त्याची चव आवडू लागते. तुरट लागत असेल तर सोबत थोडा मध घ्या किंवा गुळाचा छोटा खडा घ्या. पण आवळा चावूनच खा. चावून खाल्ल्यावर त्यातले व्हिटॅमिन सी, फायबर आणि सगळे नैसर्गिक गुण शरीराला पूर्ण मिळतात. ज्यूस केला की फायबर निघून जाते. कँडीमध्ये साखर जास्त असते. पावडरमध्ये ताजेपणा नसतो.
रोज सकाळी 1 आवळा खाल्ला तर काय होते. सगळ्यात आधी रोगप्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप लवकर होत नाही. पचनक्रिया सुधारते. पोट साफ राहते, गॅस, अॅसिडिटी कमी होते. केस दाट आणि मजबूत होतात, त्वचेवर नैसर्गिक तेज येते. वजन आटोक्यात राहायला मदत होते आणि शुगर कंट्रोलमध्ये पण फायदा होतो.
आवळ्यावरच च्यवनप्राशची कोट्यवधी रुपयांची इंडस्ट्री उभी आहे. च्यवनप्राशने विशेष काही फायदा होत नाही. त्याचा मूळ घटक आवळाच आहे. मग च्यवनप्राश का खायचा, थेट आवळाच का नाही खायचा. विकतची औषधे, केमिकल, पावडरी, सरबत याची गरजच पडणार नाही, जर आपण शरीराला नैसर्गिक पोषण देत राहिलो तर.
मी स्वतः हे करतो आहे. रोज सकाळी उठल्यावर आधी 1 आवळा चावून खातो. सुरुवातीला तुरट वाटले, आता सवय झाली. तुम्ही पण करा. तक्रार न करता, कटकट न करता, फक्त 1 आवळा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खा.