नेपाळच्या महापुरात फक्त 1 घर वाचले ! आसपास सगळं वाहून गेलं, ' त्या ' घराचा पाया भक्कम म्हणून बचावले संपूर्ण कुटुंब ! - टॉप न्यूज मराठी

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचे अंगावर काटा आणणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यात एका हिरव्या रंगाच्या घराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेगवान पाण्यासोबत मोठमोठे दगड, चिखल आणि उखडलेली झाडं वाहत असताना रस्त्यात आलेल्या अनेक इमारती काही मिनिटांतच कोसळल्या, पण हेच हिरवे घर मात्र मजबुतीने उभे राहिले. या चमत्कारामागे नशीब नाही तर त्याचा भक्कम पाया आणि रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉंक्रिट (RCC) फ्रेम आहे. 

स्ट्रक्चरल इंजिनिअर्सच्या मते, नेपाळच्या हिमालयन दऱ्यांमधील बहुतेक घरं दगडांच्या बांधकामाने बांधलेली असतात, ज्यात मजबूत फ्रेम नसते आणि ती पाण्याच्या बाजूच्या दाबात कोसळतात. मात्र या घरात स्टीलच्या सळ्या कॉलम, बीम आणि पायाशी सातत्याने जोडलेल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण घर एका मजबूत सांगाड्यासारखे काम करत होते. पुराचा जोरदार दाब आला तेव्हा या फ्रेमने ती ताकद थेट पायाद्वारे जमिनीत पोहोचवली, घराचा छोटा कॉम्पॅक्ट आकार आणि उंचवट्यावरचे लोकेशन यामुळे पाणी घराच्या दोन्ही बाजूने निघून गेले. बाल्कनीत एकमेकांना धरून बसलेले कुटुंब या मजबूत पायामुळेच सुरक्षित राहिले आणि घराने पुराचा दाब यशस्वीपणे झेलला.

नेमकं काय घडलं नेपाळमध्ये ?

गेल्या काही दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये फ्लॅश फ्लड आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पाणी आणि मलब्याच्या प्रवाहात शेकडो घरे, पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत या महापुरात 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 3000 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत आणि लष्कराकडून बचावकार्य सुरू आहे. अशा विनाशकारी परिस्थितीत हे हिरवे घर फक्त एक व्हायरल व्हिडीओ नसून, पूरग्रस्त भागात योग्य जागा निवडून मजबूत बांधकाम करणे किती गरजेचे आहे, याचे जिवंत उदाहरण बनले आहे.