पुणे: पुण्यात आज दुपारी अत्यंत धक्कादायक आणि भयानक घटना घडली आहे. शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट नंबर 4 च्या बाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन दुचाकीवरून 5 ते 6 जण शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरात आले होते. एका दुचाकीवर तिघे, तर दुसऱ्या दुचाकीवर चौघे जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्यांच्याकडे दोन गावठी पिस्तूल आणि कोयते होते. कोर्टात कामकाज सुरू असल्याने त्यावेळी परिसरात वकील, पक्षकार आणि नागरिकांची मोठी गर्दी होती. जवळच मेट्रो स्टेशन असल्याने परिसरात नेहमीच वर्दळ असते.
आरोपींनी कोर्टाच्या गेट नंबर 4 जवळ आधी त्या व्यक्तीवर गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दोन राऊंड गोळीबार झाला. त्यातून तो व्यक्ती वाचण्यासाठी पळू लागला. त्यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग केला. शिवाजीनगर कोर्ट ते फॅमिली कोर्टाच्या दिशेने पाठलाग सुरू होता. पळत असलेल्या त्या व्यक्तीला गाठून आरोपींनी कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात त्या व्यक्तीचे दोन्ही हात शरीरापासून वेगळे झाल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरच दोन पिस्तूल आणि गोळ्यांनी भरलेले मॅगझीन टाकून दिले आणि तोफखाना चौकाच्या दिशेने पळ काढला. गर्दी असूनही हातात शस्त्रे असल्याने कोणीही त्यांना अडवायला पुढे आले नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ज्या व्यक्तीवर हल्ला झाला, त्याचे नाव मंदार मारुती किवळे असल्याची माहिती समोर आली आहे. तो 20 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथील शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी होता. चार दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी तो शिवाजीनगर कोर्टात आला होता, त्यावेळी त्याच्यावर हल्ला झाला. दुसरीकडे तो एका प्रकरणातील साक्षीदार असल्याचीही माहिती सुरुवातीला समोर आली होती. नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रिक्षातून रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी परिसर सील केला आहे. घटनास्थळावरून पिस्तूल, मॅगझीन आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर कोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला होता. त्यानंतर आज कोर्टाच्या दारातच हा हल्ला झाल्याने न्यायालय परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे बाकी आहे. तपासानंतरच हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.