बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पाणीपुरवठ्याच्या नावाखाली सुरू असलेला भोंगळ कारभार आता उघड झाला आहे. एकीकडे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. अनेक ठिकाणी वेळेवर पाणी येत नाही. महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल चालावे लागत आहे. तर दुसरीकडे नागरिकांसाठी आलेले पिण्याचे पाणी चक्क नालीत सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे गेवराईकरांमध्ये प्रचंड संताप आहे.
टँकर खराब झाला, दुरुस्ती करायची आहे, असे कारण सांगून टँकरमधील हजारो लिटर पिण्याचे पाणी नागरिकांना देण्याऐवजी थेट नालीत सोडण्यात आले. या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये टँकरमधून पाणी नालीत वाहताना स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता गेवराईकरांचा प्रशासनाला थेट सवाल आहे. हा टँकर कोणाच्या मालकीचा आहे. वाहतूक कंत्राटदार कोण आहे. नागरिकांसाठी आलेले पाणी नालीत सोडण्याचा अधिकार चालकाला कोणी दिला. टँकर दुरुस्त करायचा होता तर पाणी सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये हलवता आले नसते का. की नागरिकांच्या पाण्याला प्रशासन आणि कंत्राटदारांच्या लेखी काहीच किंमत नाही.
या प्रकरणात नगरपरिषद विभागाशी संपर्क साधला असता आम्ही केवळ पाणीपुरवठा करतो, अशी भूमिका घेण्यात आली. तर गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांच्याकडे विचारणा केली असता संबंधित वाहतूक टेंडरधारकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र केवळ नोटीस बजावून हा प्रश्न सुटणार आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. पिण्याचे पाणी वाया घालवणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार. नागरिकांच्या हक्काच्या पाण्याची अशी उधळपट्टी करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का. नोटीसच्या पलीकडे जाऊन संबंधित चालक, मालक आणि टेंडरधारकांवर कठोर कारवाई होणार का. की नेहमीप्रमाणे चौकशी आणि आश्वासनांच्या नावाखाली हा प्रकारही दाबला जाणार, अशी भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत.
एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची वणवण आणि दुसरीकडे हजारो लिटर पाणी नालीत, हा निष्काळजीपणा आहे की जनतेच्या पैशांची उघड उधळपट्टी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पाणी हे नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न आहे, कंत्राटदारांच्या मनमानीचा खेळ नाही, अशी भावना गेवराईकर व्यक्त करत आहेत.
गेवराईतील या संतापजनक प्रकाराची वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सोमनाथ मोठे सह श्याम जाधव, बीड / गेवराई