धुळे : धुळे शहरात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. भाजपच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर महापौर मायादेवी परदेशी, त्यांचा मुलगा विकी परदेशी आणि संजय शर्मा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होती. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे त्या मानसिक तणावाखाली आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर धुळ्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. सोशल मीडियावरील वाद इतक्या टोकाला जाईल, अशी कल्पना कोणालाही नव्हती. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू असून नेमके कारण शोधले जात आहे.