वाशीमध्ये ऑईल कंपनीला भीषण आग, शेजारील दोन कंपन्या जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही - टॉप न्यूज मराठी

मुंबई : मुंबईतील वाशी भागात रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. सेक्टर 18 मधील एका ऑईल कंपनीत रात्री साडे दहाच्या सुमारास ही आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाळा आकाशात दिसू लागल्या.

आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या पाचही अग्निशमन केंद्रातून गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत ऑईल कंपनीसोबतच शेजारील प्लायवूड आणि कुरिअर कंपनीही जळून खाक झाली.

आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.