पुणे २३ नोव्हेंबर २०२६: भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे असामान्य व्यक्तिमत्त्व, त्यांचा संगीतप्रवास आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदान उलगडून दाखवणारे ‘भीमसेन – द मॅन अँड हिज म्युझिक’ हे दृकश्राव्य आणि चित्रमय प्रदर्शन आता झपुर्झा म्युझियम ऑफ आर्ट अँड कल्चर येथे रसिकांसाठी खुले झाले आहे. वर्षभर सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला या महान गायकाचा परिचय करून देण्याबरोबरच त्यांच्या जीवनप्रवासातील संघर्ष, जिद्द आणि संगीतसाधनेची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रदर्शनाच्या उघाटन प्रसंगी अजित गाडगीळ, जयंत जोशी, श्रीनिवास जोशी, यशोदा जोशी, विराज जोशी आणि सर्व जोशी कुटुंबीय उपस्थित होते.
या प्रदर्शनाची मूळ संकल्पना अजित गाडगीळ यांची असून संकल्पनेचा विस्तार व ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पं. भीमसेन जोशी यांचे चिरंजीव जयंत जोशी, नात यशोदा जोशी, पराग नाटेकर व अश्विन चिकेरूर यांनी मोलाचे योगदान दिले. उपक्रमास अजित गाडगीळ, विनय फडणीस, चित्रा मेटे व क्षीरसागर आपटे फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे.
प्रदर्शनाविषयी माहिती देताना अजित गाडगीळ म्हणाले, “पं. जोशी यांच्या बालपणापासून संगीताच्या ध्यासापर्यंत, गुरूच्या शोधापासून कठोर संगीतसाधनेपर्यंत आणि त्यानंतरच्या देदीप्यमान कारकिर्दीपर्यंतचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडण्यात आला आहे. दिवसाच्या आठ प्रहरांच्या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली आहे. पूर्वाह्न या पहिल्या प्रहरात त्यांच्या जन्मापासून बालपणापर्यंतचा टप्पा मांडण्यात आला आहे. त्यानंतर मध्याह्न, अपराह्न आणि मध्याह्नोत्तर या प्रहरांमधून गुरूचा शोध, तीव्र संगीतसाधना आणि प्रारंभीचे यश यांचा मागोवा घेतला आहे. तर संध्या, प्रदोष, निशीथ आणि उषा या पुढील प्रहरांमधून त्यांच्या ध्वनिमुद्रित गायनाचा ठेवा, सांगीतिक वारसा आणि एका मैफलीचा अनुभव देणारी विशेष मांडणी साकारण्यात आली आहे.”
अवघ्या दहाव्या वर्षी संगीत शिकणे हाच आपला जीवन हेतू आहे हे त्यांना समजले. त्या ध्यासाने घर सोडणाऱ्या या बालकाचा प्रवास आजच्या तरुणाईसाठी विशेष प्रेरणादायी आहे. संगीताचा शोध घेताना त्यांनी त्या काळात अनेक ठिकाणी, रेल्वेने खडतर प्रवास केला. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांची सवाई गंधर्व यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्या संगीतप्रवासाला नवी दिशा मिळाली. आजच्या काळात गॅजेट्स आणि डिजिटल साधनांच्या विश्वात रमलेल्या तरुणांसमोर लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून त्याच्या पूर्ततेसाठी घेतलेले अथक परिश्रम, जिद्द, त्याग आणि समर्पण यांचा आदर्श या प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे जयंत जोशी यांनी सांगितले.
पं. भीमसेन जोशी यांची २०० हून अधिक दुर्मीळ छायाचित्रे हे या प्रदर्शनाचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः टिपलेली काही छायाचित्रे, बालपणीच्या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित चित्रांकने व थोडक्यात दिलेली संबंधित माहिती, त्यांनी वापरलेला तानपुरा, विविध पुरस्कार आणि स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. त्यांच्या मुलाखतींचे निवडक दृकश्राव्य अंश, संगीताच्या ध्वनिमुद्रिका तसेच चित्रपट निर्माते विकास देसाई यांनी १९६८ मध्ये तयार केलेल्या आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांनी पुनर्संचयित केलेल्या माहितीपटाचाही यात समावेश आहे. या माध्यमांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि सांगीतिक कारकिर्दीचे विविध पैलू रसिकांसमोर येणार असल्याची माहिती यशोदा जोशी यांनी दिली.
केवळ एका महान गायकाच्या स्मृतींना उजाळा देणे, एवढाच या प्रदर्शनाचा उद्देश नसून, त्यांचा सांगीतिक वारसा जतन करणे, नव्या पिढीला त्यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा देणे आणि भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेशी त्यांची नाळ जोडणे, हा यामागील मुख्य हेतू आहे, असे मत अजित गाडगीळ यांनी व्यक्त केले.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची प्रदर्शनात वापरण्यात आलेली छायाचित्रे प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय, सतीश पाकणीकर, ओ. पी. शर्मा, जितेंद्र आर्य, मोहन वाघ, साज अगरवाल, जयंत जोशी, अनिल देशपांडे आणि अनेक अज्ञात छायाचित्रकारांनी काढलेली आहेत.