मानसिक आरोग्य : मन शांत करण्यासाठी देवपूजा सर्वोत्तम उपाय ; देवासमोर मन मोकळं बोलून तर पहा, अध्यात्मिकच नाही तर शास्त्रीय कारण वाचा... - टॉप न्यूज मराठी

आज-काल मानसिक आरोग्य हा सर्वात अवघड विषय म्हणावा लागेल. धकाधकीच्या जीवनात स्पर्धा, नात्यांमधली चढाओढ, बदललेल्या शारीरिक आणि मानसिक गरजा, आर्थिक गणित असे अनेक प्रश्न उपस्थित असताना अगदी नवरा-बायकोला देखील एकमेकांचं मन समजून घेताना मोठ्या समस्या येतात. कारण आयुष्यातल्या या चढाओढी सांभाळताना समोरच्यानेच मन सांभाळावं, अशा अपेक्षेने वादविवाद वाढत जातात आणि मानसिक आरोग्य अधिकच खचत जाते.

अशावेळी आपण आधार घेतो तो दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीचा. मन मोकळं करण्यासाठी घरातली व्यक्ती, मित्र-मैत्रीण असा कोणाचा तरी आधार घेताना अनेक वेळा असा अनुभव येतो की, मन तर मोकळं झालं, पण मार्ग मात्र मिळाला नाही. अशावेळी सर्वोत्तम पर्याय आहे तो म्हणजे देवपूजा.

आता तुम्ही म्हणाल की, पुन्हा देवपूजा केल्याने खरंच मार्ग मिळतो का. मग देव अशी संकटं समोर का आणतो. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जाणून घ्यायला हवे की, समोर प्रत्येक वेळी येणारं नवं आव्हान म्हणजेच आयुष्य आणि ते आव्हान आपण कसं पेलवतो म्हणजेच जीवन आहे. हे सर्व करताना जर मन शांत असेल तर स्वतःला समजून घेणं सोपं जातं. आणि जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो, त्यावेळी आपण अगदी सहजच दुसऱ्याला देखील समजून घेण्यास सुरुवात करतो. मग देवपूजा केल्याने हे सर्व कसं मिळू शकतं. चला तर पाहूयात...

सकाळी उठून आपण देवासमोर दिवा लावतो. फुले वाहतो. हात जोडतो. पण मनात विचार चालूच असतात. आज काय करायचे आहे, ऑफिसचे काम, मुलांचा अभ्यास, पैशाची चिंता, काल झालेला वाद. तोंडाने स्तोत्र म्हणत असतो, पण मन कुठेतरी दुसरीकडेच भटकत असते. असे तुम्हालाही होते का, मग तुम्ही एकटे नाहीत. आजकाल बहुतेक लोकांची हीच समस्या आहे.

खरे तर देवपूजा म्हणजे फक्त दिवा लावणे, अगरबत्ती लावणे किंवा मंत्र म्हणणे नाही. पूजा म्हणजे मन देवाशी जोडणे. मन शांत नसेल तर पूजा ही फक्त एक सवय बनून राहते. त्यातून मनाला शांतता मिळत नाही. मग लोक म्हणतात, मी एवढी पूजा करतो, तरी मला शांतता का मिळत नाही. त्याचे कारण पूजा करण्यात नाही, तर मनाच्या अवस्थेत आहे.

मन का भटकते, हे आधी समजून घेऊया. आपले मन दिवसभर मोबाईल, बातम्या, काम, चिंता यात गुंतलेले असते. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहिला की मनात शंभर विचार येतात. त्याच मनाने आपण पूजेला बसतो. मग मन शांत कसे राहणार. मनाला शांत करण्यासाठी आधी त्याला थोडी विश्रांती द्यावी लागते.

मन शांत करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे पूजेआधी 5 मिनिटे शांत बसणे. दिवा लावण्यापूर्वी फक्त शांत बसा. डोळे बंद करा. काहीही म्हणू नका. फक्त श्वासाकडे लक्ष द्या. हळू हळू श्वास घ्या आणि सोडा. 5 मिनिटांत मनातील गडबड कमी होईल. त्यानंतर पूजा सुरू केली तर मन पटकन लागते.

दुसरा उपाय म्हणजे नामस्मरण. नामस्मरण म्हणजे मोठ्याने ओरडून मंत्र म्हणणे नाही. मनातल्या मनात देवाचे नाव घेत राहणे. काम करताना, चालताना, स्वयंपाक करताना मनात नाम घेतले तरी चालते. यामुळे मन एकाच विचारात गुंतून राहते. वाईट विचार, राग, चिंता हळूहळू कमी होतात. नामस्मरणाने मनाला एक आधार मिळतो.

तिसरा उपाय म्हणजे सकाळी मोबाईलपासून दूर राहणे. उठल्यावर पहिला तास मोबाईल न पाहता घालवा. बातम्या, सोशल मीडिया, मेसेज हे सगळे नंतरही पाहता येते. पण सकाळची पहिली 30 मिनिटे जर शांत गेली तर पूर्ण दिवस शांत जातो. अनेक लोकांना याचा खूप चांगला अनुभव आला आहे.

चौथा उपाय म्हणजे मनातील राग आणि चिंता देवासमोर मोकळी करणे. आपण देवासमोर फक्त मागणे मागतो. पण मनात काय चालले आहे, हे सांगत नाही. देवाला मित्र समजून बोला. मला आज त्रास होतोय, मला भीती वाटते, मला राग येतोय, असे मनातल्या मनात सांगा. मन हलके होते. पूजा ही मागण्यासाठी नाही, तर मन मोकळे करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा.

पाचवा उपाय म्हणजे पूजेत घाई करू नका. आपण अनेकदा घड्याळ पाहत पूजा करतो. 5 मिनिटांत पूजा संपवायची आहे, अशी घाई असते. घाईत केलेली पूजा मनाला लागत नाही. रोज 20 मिनिटे पूजा करता येत नसेल तर फक्त 10 मिनिटे करा, पण मनापासून करा. एक फूल मनापासून वाहणे, हे घाईत वाहलेल्या शंभर फुलांपेक्षा चांगले असते.

मन शांत झाले की आयुष्यात अनेक बदल दिसतात. राग कमी होतो. निर्णय चांगले घेतले जातात. झोप चांगली लागते. घरात वाद कमी होतात. कामात लक्ष लागते. हे सगळे देवाच्या कृपेमुळे होते, असे लोक म्हणतात. खरे तर ते मन शांत झाल्यामुळे होते.

त्यामुळे उद्यापासून पूजा करताना फक्त दिव्याकडे पाहू नका, स्वतःच्या मनाकडेही पाहा. मन शांत असेल तर देव दूर नाही. देव तुमच्याच मनात आहे. मन शांत करा, पूजा आपोआप मनापासून होईल.