आजकाल प्रत्येक घरात एक चित्र हमखास दिसते. लहान मूल जेवताना, रडताना किंवा हट्ट करताना पालक त्याच्या हातात मोबाईल देऊन मोकळे होतात. सुरुवातीला हे सोयीचे वाटते. मूल शांत होते, जेवते, रडणे थांबते. पण हळूहळू हाच मोबाईल मुलाच्या आरोग्यासाठी मोठी समस्या बनत चालला आहे.
लहान मुलांच्या डोळ्यांवर मोबाईलचा सर्वात जास्त परिणाम होतो. मोबाईलचा स्क्रीन सतत जवळून पाहिल्याने डोळे कोरडे पडतात, डोळ्यातून पाणी येते, डोळे लाल होतात, डोके दुखते. काही मुलांना लहान वयातच चष्मा लागतो. रात्री अंधारात मोबाईल पाहिल्यास डोळ्यांवर आणखी ताण येतो.
मोबाईलचा परिणाम फक्त डोळ्यांपुरता मर्यादित नाही. मेंदूवरही त्याचा वाईट परिणाम होतो. सतत व्हिडिओ, गेम आणि रील्स पाहिल्याने मुलांचे लक्ष विचलित होते. अभ्यासात लक्ष लागत नाही. एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकण्याची सवय कमी होते. मुले पटकन चिडतात, हट्टी होतात, रागावतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून रडणे सुरू होते.
झोपेवरही मोबाईलचा मोठा परिणाम होतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्याने मेंदूला विश्रांती मिळत नाही. त्यामुळे झोप उशिरा येते, झोप अपूर्ण राहते. सकाळी उठल्यावरही मुले थकलेली वाटतात. याचा थेट परिणाम शाळेतील अभ्यासावर आणि वागणुकीवर होतो.
मोबाईल जास्त पाहणारी मुले इतर मुलांमध्ये मिसळणे टाळतात. खेळणे, बोलणे, गप्पा मारणे कमी होते. त्यामुळे बोलण्याचा विकास उशिरा होतो. काही मुले एकटी राहणे पसंत करतात. आत्मविश्वास कमी होतो.
मग मुलांना मोबाईल द्यायचाच नाही का, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. तज्ज्ञ सांगतात, मोबाईल पूर्णपणे बंद करणे शक्य नाही, पण वेळेचे बंधन घालणे गरजेचे आहे. 2 वर्षांखालील मुलांना मोबाईल देऊच नये. 2 ते 5 वर्षांच्या मुलांना दिवसातून फक्त अर्धा तासापेक्षा जास्त मोबाईल देऊ नये. मोठ्या मुलांनाही अभ्यास आणि झोप सोडून 1 ते 2 तासांपेक्षा जास्त स्क्रीन देऊ नये.
जेवताना, झोपताना आणि अभ्यास करताना मोबाईल अजिबात नको. मुलांसोबत पालकांनी वेळ घालवावा. त्यांना मैदानी खेळ, चित्र काढणे, गोष्टींची पुस्तके, पझल, गाणी याकडे वळवावे. घरात सर्वांनी एकत्र जेवण्याची आणि बोलण्याची सवय लावा
मुलांना मोबाईल देणे हा तात्पुरता उपाय आहे, पण त्याचे परिणाम कायमचे असू शकतात. त्यामुळे आजच मोबाईलची सवय कमी करा. मुलांचे डोळे, मेंदू आणि भविष्य वाचवा.