नवी दिल्ली : जवळच्या नात्यात होणाऱ्या विवाहांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अशा विवाहांतून जन्माला येणाऱ्या मुलांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असे मत न्यायालयाने नोंदवले. यावर नियंत्रणासाठी कायदा करता येईल का, याबाबत केंद्र सरकारचे मत जाणून घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
बेंगळुरू येथील दृष्टिहीन तरुणाने ही याचिका दाखल केली आहे. आपल्या आई-वडिलांनी जवळच्या नात्यात विवाह केल्यामुळे आपल्याला जन्मजात आजारांना सामोरे जावे लागल्याचे त्याने म्हटले आहे. दक्षिण भारतात अशा विवाहांचे प्रमाण जास्त असल्याचे याचिकेत नमूद आहे.
सुनावणीत न्यायालयाने सांगितले, लग्नाचा निर्णय हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यामुळे न्यायालय थेट बंदी घालू शकत नाही. मात्र संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. जनजागृती हाही यावर उपाय असू शकतो, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले. आता केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.