कार्तिक एकादशी निमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सहकुटुंब शासकीय महापूजा संपन्न - टॉप न्यूज मराठी

पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दुमदुमून गेली. श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सहकुटुंब अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. 

पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह विठुरायाची विधिवत महापूजा केली. यावेळी त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे हे देखील उपस्थित होते. शिंदे कुटुंबीयांच्या वतीने विठुरायाला सोन्याची कोयरी आणि फुलांची सुंदर नक्षी असलेला सुवर्णहार अर्पण करण्यात आला. 

परंपरेनुसार आषाढी एकादशीचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीचा सोहळा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होतो. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे शुक्रवारीच पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्याने कार्तिकी एकादशी सोहळ्याला सुरुवात झाली. 

यंदाच्या शासकीय महापूजेत मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील शेतकरी दाम्पत्य सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रणिता शिंदे यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. मंदिर समितीकडून दरवर्षी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांमधून मानाच्या वारकऱ्याची निवड केली जाते. सुधाकर शिंदे हे व्यवसायाने शेतकरी असून, ते गेल्या 11 वर्षांपासून सहकुटुंब कार्तिकीची वारी करत आहेत. 

महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी राज्यातील बळीराजासाठी साकडे घातले. यंदा राज्यात भीषण दुष्काळ असल्याने बळीराजा संकटात आहे. त्याच्यावरील संकट दूर होऊन त्याला दिलासा मिळो, तसेच राज्यात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितले, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन आणि शिवसेना देखील ठामपणे उभी असून त्याला दिलासा देण्याचे प्रयत्न सुरूच आहेत, असेही ते म्हणाले.

महापूजेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपुरातील धुंडा महाराज देगलूरकर मठात जाऊन विविध महाराज मंडळींची संतपूजा केली. यावेळी कीर्तन-प्रवचनातून शेतकऱ्यांना मानसिक आधार द्यावा, असे आवाहन त्यांनी संत मंडळींना केले. 

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी 35 हून अधिक प्रकारच्या देशी व विदेशी फुलांचा वापर करण्यात आला असून, सुमारे 5 टन फुलांमधून मंदिर परिसराला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. संत नामदेव पायरी, महाद्वार, विठ्ठल सभामंडप, सोळखांबी, चौखांबी, श्री रुक्मिणीमाता सभामंडप येथे ही पुष्पसजावट साकारण्यात आली आहे. 

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. सामान्य भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले असून, दर्शन मंडपाच्या उभारणीसाठी पर्यटन विभागाकडून 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पंढरपूरला केवळ तीर्थक्षेत्र म्हणून नव्हे, तर आधुनिक आणि पर्यावरणपूरक धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर ते घुमान या सायकलवारीला झेंडा दाखवला. पांडुरंगाच्या आशीर्वादाची ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन हे सायकलपटू पंजाब येथील घुमानला निघाले आहेत. त्यांच्या या सायकलवारीला शुभेच्छा देत बळीराजावरील संकट, दुष्काळाचे सावट दूर कर आणि बळीराजाला ताकद दे, असे साकडे विठुरायाकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरत गोगावले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाखो वारकरी उपस्थित होते.