सरांनी अन् बाईंनीच घेतला झाडू हाती, आलेगावकर विद्यालयात शिक्षकांकडूनच शाळेची साफसफाई - टॉप न्यूज मराठी

पुणे : पूर्वी शाळेची अंतर्बाह्य स्वच्छता करण्याचे काम विद्यार्थी, शिपाई, शिक्षक एकत्रितपणे करायचे. वाढत्या शहरीकरणात शाळांची स्वच्छता हा फक्त शिपायांनी करण्याचा भाग उरला. मात्र, या काळातही काही शाळांतील शिक्षक स्वत: पुढाकार घेऊन शाळेची निगा राखण्याचे काम करत आहेत. खडकी येथील आलेगावकर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा शुरू होण्यापूर्वी स्वत:च झाडू हाती घेतला आणि दोन दिवसांत शाळा चकाचक केली.

खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालयाला मोठी परंपरा आहे. 1913 साली आलेगावकर बंधूंनी सुरू केलेल्या या शाळेने अनेक नावलौकीक मिळवले आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वी या विद्यालयातील शिक्षकांनीच विद्यार्थी व शिपायांच्या मदतीने सर्व शाळेची स्वच्छता केली. पर्यवेक्षिका अनिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक मंगेश दळवी, दिवाकर पाटील, मेघमाला खरकांडे, सिद्धार्थ आल्हाट या शिक्षकांनी प्रत्यक्ष झाडू हातात घेत या उपक्रमात सहभाग घेतला.

शिक्षकांच्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी विशेष कौतुक केले.