आरोग्य : टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसता ? ही सवय ठरू शकते गंभीर आजारांना कारण - टॉप न्यूज मराठी

सकाळी उठल्यावर अनेकांचा हात आधी मोबाईलकडे जातो. टॉयलेटमध्ये जातानाही मोबाईल सोबत नेण्याची सवय आता सामान्य झाली आहे. रील्स पाहता पाहता, बातम्या वाचता वाचता टॉयलेटमध्ये 20 ते 25 मिनिटे कशी निघून जातात, हे अनेकांना कळतही नाही. मात्र ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती टॉयलेट सीटवर बराच वेळ बसून राहते, तेव्हा गुदद्वाराच्या आसपासच्या नसांवर दबाव पडतो. हा दबाव सतत राहिल्यास पाईल्ससारखा त्रास सुरू होऊ शकतो. तसेच पोटाच्या नैसर्गिक हालचालींवरही परिणाम होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.

अनेकांना टॉयलेट सीटवर बसणे आरामदायक वाटते. मात्र शरीरासाठी ही स्थिती योग्य नाही. शौचासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक प्रक्रिया लांबल्याने पोट साफ होण्यात अडथळा निर्माण होतो. काही वेळा याचा परिणाम किडनीशी संबंधित समस्यांवरही होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

डॉक्टरांच्या मते टॉयलेटमध्ये पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसू नये. मोबाईलमुळे वेळेचे भान राहत नाही. त्यामुळे मुद्दाम मोबाईल बाहेर ठेवण्याची सवय लावावी.

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी आहारात बदल करणे गरजेचे आहे. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. पुरेसे पाणी प्यावे. पाईल्सचा त्रास असलेल्यांनी जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. नियमित चालणे आणि व्यायाम यामुळेही पचनक्रिया सुधारते.

टॉयलेट ही मोबाईल वापरण्याची जागा नाही. ही सवय सोडली तर पाईल्स, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक त्रासांपासून वाचता येईल. त्यामुळे आजपासूनच मोबाईल बाहेर ठेवून टॉयलेटला जाण्याचा नियम करा.