दक्षिण रत्नागिरीत शिंदे गटाला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश - टॉप न्यूज मराठी

रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण भागात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. छावा संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील दादर येथील मनसे कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.

छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष धावडे यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे सुमारे शंभर ते दीडशे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मनसेत दाखल झाले. या प्रवेशामुळे दक्षिण रत्नागिरीत मनसेची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पक्षप्रवेशाचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी सत्ताधारी गटात प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला होता. आता त्याच शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. दक्षिण रत्नागिरीत मनसेला नवे बळ मिळाल्याने आगामी निवडणुकांमध्ये तेथील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्नांवर काम करण्याची भूमिका मांडली.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाच्या स्थानिक संघटनेवर परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेकडून मात्र या प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्षाची बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.