सोने खरेदीचा प्लॅन करताय का? मग ही बातमी वाचाच ? हॉलमार्क सोने खरेच शुद्ध आहे का? कॅगच्या अहवालाने उपस्थित केला सवाल - टॉप न्यूज मराठी

भारतीय मानक ब्युरोने बहुतांश सराफा दुकानांची तपासणीच केली नसल्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या शुद्धतेबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नियमानुसार नोंदणीकृत ज्वेलर्सची वर्षातून किमान एकदा तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात दुकानांची तपासणी झालीच नाही. 2024-25 या वर्षात सुमारे 28 हजार परवानाधारक ज्वेलर्सपैकी फक्त 5 हजारांहून थोड्या अधिक दुकानांची तपासणी झाली. याचा अर्थ 80 टक्क्यांहून अधिक दुकाने तपासणीविना व्यवसाय करत आहेत.

देशात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये हॉलमार्कशिवाय सोने विकणे बेकायदेशीर आहे. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांची फसवणूक टळेल, असा सरकारचा उद्देश होता. मात्र तपासणीच होत नसल्याने ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता वाढली आहे.

या त्रुटीबाबत ब्युरोने मनुष्यबळाची कमतरता आणि दूरच्या भागातून नमुने आणण्यातील अडचणींचे कारण दिले. मात्र कॅगने हे स्पष्टीकरण मान्य केले नाही. हा अहवाल लवकरच संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना ग्राहकांनी बिल, हॉलमार्क क्रमांक आणि शुद्धतेची खात्री करण्याचे आवाहन केले जात आहे.