मुंबई - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून विलिनीकरणावर सातत्याने चर्चा सुरू आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांकडून यावर वारंवार भाष्य केले जात आहे. सत्तेत असूनही या विषयावर बोलले जात असल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम वाढला आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला विचारल्याशिवाय विलिनीकरण होणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे विलिनीकरणाचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात होते. दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अजितदादा असते तर 12 फेब्रुवारीलाच विलिनीकरण झाले असते, असे वक्तव्य केले. सध्या कोणतीही चर्चा नाही, असेही ते म्हणाले. मात्र त्यांच्या संदिग्ध विधानामुळे चर्चा थांबलेली नाही.
दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही भेट विकासकामांसाठी होती की विलिनीकरणासाठी, यावर तर्कवितर्क सुरू आहेत. भेटीनंतर काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.